महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड व अण्णा भाऊ साठे यांचे प्रकाशित-अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चरित्र साधने प्रकाश समित्यांप्रमाणे आता छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचे समग्र साहित्य ग्रंथरूपाने सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महान व्यक्ती व सुधारक यांनी लिहिलेले साहित्य, तसेच त्यांच्या जीवनावर अभ्यासकांनी लिहिलेले साहित्य हे अशा महापुरुषांचा जीवनपट, त्यांचा संघर्ष, त्यांनी समाजासाठी, राष्ट्रासाठी केलेला त्याग, हे सर्व डोळ्यासमेर उभे करते. त्यातून प्रेरणा घेऊन नवी पिढी राष्ट्राच्या व राज्याच्या विकासात आपले योगदान देत असते. त्याचे महत्त्व ओळखून या महापुरुषांचे साहित्य सामान्य जनता, तसेच विद्यार्थ्यांपयर्ंत पोहचविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत महात्मा फु ले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गाडकवाड व अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या

आहेत. त्याच धर्तीवर आता छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या चरित्र साधने प्रकाशन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

या समित्यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील, तर छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचे चरित्र अभ्यासकांची समितीचे सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. समित्यांना तीन वर्षांची मुदत राहणार आहे. या समित्यांच्या वतीने शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचे मूळ साहित्य मराठी भाषेत प्रकाशित होईल. त्याचबरोबर हे साहित्य हिंदी, इंग्रजी व इतर भाषेतही भाषांतरित करून प्रकाशित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.