गुजरातमधील ‘वापी’ परिसरातील काही रासायनिक कंपन्यांमधून मालाचे उत्पादन केल्यानंतर मोठय़ा प्रमाणात टाकाऊ घातक रसायन बाहेर पडते.  या रसायनावर ‘सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात’(सीईटीपी) प्रक्रिया करण्याचा मोठा खर्च वाचविण्यासाठी या कंपन्या हे घातक रसायन टँकरमध्ये भरून दोनशे ते तीनशे किलोमीटरवर   असलेल्या कल्याण, उल्हासनगर येथील वालधुनी नदी व नाल्यांमध्ये टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुजरातच्या या ‘प्रगती’पायी महाराष्ट्रातील नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला हा खेळ राज्यातले भाजप सरकार रोखणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उद्योजक, टँकर टोळ्या, स्थानिक पोलीस आणि दलालांच्या मध्यस्थीने हा व्यवहार सर्रास सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही या लादल्या जात असलेल्या जलप्रदूषणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्यामुळे हे प्रकार वाढत आहेत. वापीमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर गुजरात सरकार कठोर कारवाई करते. त्यामुळे हे ‘गैरधंदे’ महाराष्ट्राकडे वळत असल्याचे एका रसायानिक तज्ज्ञाने सांगितले.
वापीतील उद्योगांना गुजरात सरकार अनेक कर सवलती देते. त्यामुळे तेथे रासायनिक कंपन्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या कंपन्यांच्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया खूप महागडी आहे. वापीतील ‘सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात’ हे सांडपाणी सोडायचे  तर उत्पादित मालाच्या खालोखालचा दर  मोजावा लागतो. त्यामुळे अधिक नफ्याच्या हव्यासाने वापीतील काही उद्योजक महाराष्ट्राची वाट चोखाळतात.  
यापूर्वी ‘एमपीसीबी’ कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र संगेवार यांनी धडाक्याने टँकरजप्ती व फौजदारी कारवाई सुरू केली होती.
वापीतून अशाप्रकारे अवैध घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या टँकर टोळीविरुध्द चार वर्षांपूर्वी एक लेखमाला ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द केली होती. तिची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेत या टँकर चालकांना शोधून त्यांच्यावर कारवाईचा सपाटा लावला होता. त्यावेळी काही टँकर चालक अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालणे, त्यांना धमकावणे असे प्रकार करीत होते. या टँकर टोळीचे हात मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचे त्यावेळी उघड झाले होते. आघाडी सरकारमधील एका मंत्र्यानेच टँकरविरोधी कारवाई रोखली होती.

‘लक्ष्मी’पूजन!
हे घातक रसायन अन्य प्रांतात टाकण्यासाठी टँकरवाले सुमारे ३५ हजार रूपये घेतात. संध्याकाळी निघालेले हे टँकर वाटेतील पोलीस व तपासणी नाक्यांचे ‘लक्ष्मी’पूजन करून कल्याणमध्ये मध्यरात्री पोहोचतात. कल्याणजवळील वालधुनी नदी पात्रात, उल्हासनगरमधील नाले परिसरात स्थानिक दलालांच्या मदतीने बिनबोभाट हे रसायन ओतले जाते.