शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपायायोजना म्हणून सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी बसविणे बंधनकारक केले आहे. यामुळे विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना त्यांच्या न्याय मागण्या प्रशासनापर्यंत पोहचवणे शक्य होणार आहे.राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटय़ा बसविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश सरकारने शुक्रवारी काढलेल्या परिपत्रकात दिले आहे. ही तक्रारपेटी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वाना दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक असणार आहे.

तसेच ही तक्रारपेटी आठवडय़ातून एकदा शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात यावी असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्या क्षेत्रात पोलीस पाटील उपलब्ध आहेत अशा क्षेत्रातील शाळांनी तक्रारपेटी उघडताना त्यांची सेवा उपलब्ध करून घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी पोलीस प्रतिनिधी उपलब्ध करणे शक्य नसेल त्या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीत तक्रारपेटी उघडण्यास हरकत नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तक्रारपेटीत संवेदनशील स्वरुपाची तक्रार असल्यास तक्रारींबाबत तात्काळ पोलीस यंत्रणेचे सहाय्य घेण्याची सूचनाही यात करण्यात आली आहे. तक्रारपेटीतील सर्व तक्रारांची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत आवश्यकती कार्यवाही करण्यात यावी. ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन स्तरावर निकाली काढणे शक्य असतील त्या तात्काळ निकाली काढाव्यात. इतर तक्रारी क्षेत्रिय कार्यालयांमार्फत शासनापर्यंत पोहचवाव्यात असेही यात नमूद करण्यात आले आहे. या पेटीत तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त राहिल व तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षात घेण्यात यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.