नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातून त्याच्या समर्थनार्थ कंपनीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने शिवसेनेची भूमिका बदलल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे नाणारवासीयांचे काही प्रतिनिधी वृत्तपत्राच्या कार्यालयात धडकले.

नाणार प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही आंदोलनासाठी तयार आहोत, आंदोलनाची शस्त्रे बाजूला ठेवली होती, असे प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तर नाणारचे गाडले गेलेले भूत पुन्हा वर येणार नाही, शिवसेनेचा विरोध कायम असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी मोठा विरोध केल्याने भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा, यासाठी काही ग्रामस्थ व इतरांनी प्रयत्न सुरू केले असून शनिवारी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने संभ्रम निर्माण झाला. शिवसेनेने भूमिका बदलून पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले. त्यामुळे खासदार राऊत यांनी वालम यांच्याशीही चर्चा केली. यासंदर्भात माहिती देताना वालम म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री झाल्यावर सदिच्छा भेट घेतली, तेव्हा नाणारचा विषय पुन्हा येणारही नाही. ते भूत गाडले गेले आहे, असे आम्हाला सांगितले होते. ज्या वेळी आंदोलन सुरू होते, तेव्हा कंपनीने अन्य प्रसिद्धीमाध्यमांमध्ये समर्थनाच्या जाहिराती दिल्या, तेव्हा ‘सामना’त जाहिरात नव्हती. आता पुन्हा अशा जाहिराती देऊन प्रकल्प सुरू करावयाचा प्रयत्न होत असेल, तर आम्हीही सज्ज आहोत. त्याचबरोबर रोहे येथे प्रकल्प सुरू करता येईल का, याची चाचपणीही सुरू आहे. पण तेथेही स्थानिकांचा विरोध असल्यास आम्ही त्यांच्याबरोबर आंदोलनात उतरू, असे वालम यांनी स्पष्ट केले.