दस्तुरखुद्द ‘मातोश्री’ने दखल घेत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांना कानपिचक्या दिल्यामुळे अखेर मंगळवारी काँग्रेसच्या सहा नगरसेविकांविरुद्ध करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली.
    स्थायी समिती अध्यक्षांकडून तुटपुंजा निधी मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस नगरसेवकांनी गेल्या सोमवारी पालिका सभागृहात प्रचंड गोंधळ घातला होता.  त्यामुळे महापौर स्नेहल आंबेकर यांनी काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे, पारुल मेहता, नैना सेठ, वकारुन्निसा अन्सारी, अजंता यादव आणि अनिता यादव यांना एका दिवसासाठी निलंबित केले. त्यांनी मंगळवारी सभागृहात शिट्टय़ा फुंकून गोंधळ घातला. त्यामुळे त्यांना १५ दिवसांसाठी निलंबित केले. स्नेहल आंबेकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्यामध्ये दुपारी बैठक झाली आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यावर शिक्कामोर्तब झाले.