गेले वर्षभर रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर माजी आमदार प्रा. जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करून पक्षश्रेष्ठींनी मराठी आणि दलित असा दुहेरी मेळ साधला आहेच शिवाय यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठा नेत्याच्या निवडीचा मार्गही मोकळा झाला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता मुंबईचा अध्यक्ष मराठी आणि दलित समाजातील असावा हे पक्षाने निश्चित केले होते. या पदासाठी एकनाथ गायकवाड यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र कोणत्याही गटातटाचे नसलेले चांदूरकर यांच्या नावावर उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शिक्कामोर्तब केले. चांदूरकर पूर्वी सुनील दत्त यांचे निकटवर्तीय मानले जात. दत्त यांच्या निधनानंतर त्यांचे प्रिया दत्त यांच्याशी बिनसले. गेल्या निवडणुकीत चांदूरकर यांच्या उमेदवारीस प्रिया दत्त यांनीच विरोध केला होता. खेरवाडीचे तीनदा प्रतिनिधीत्व केलेले चांदूरकर गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते.
पुढील लोकसभा निवडणुकीत दलित, अल्पसंख्याक, झोपडपट्टीवासीय यांची मते महत्त्वाची असल्याने पक्षाने दलित चेहरा पुढे केला आहे.
काव्यात्मक न्याय
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : कृपाशंकर सिंह यांच्यानंतर अध्यक्षपदी चांदूरकर यांची नियुक्ती करून काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांना काव्यात्मक न्याय दिल्याचे मानले जात आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले चांदूरकर यांना ऐन मतदानाच्या दिवशी पैसेवाटपाच्या आरोपावरून पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यामागे कृपाशंकर सिंह यांचाच हात असल्याचा आरोप होता. आता भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच कृपाशंकर यांना शहर अध्यक्षपद सोडावे लागले आहे आणि चांदूरकर त्या पदी आले आहेत!