News Flash

“P-305 दुर्घटना मानवनिर्मितच, मोदी सरकार चुकांमधून कधी शिकणार?” काँग्रेसचा गंभीर आरोप!

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पी-३०५ तराफ्याला झालेल्या दुर्घटनेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

तौते चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये ओएनजीसीसाठी तेल उत्खनन करणारा P-305 हा तराफा बुडाल्याची दुर्घटना ही पूर्णपणे मानवनिर्मित असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, ही पूर्णपणे मानवनिर्मित दुर्घटना असून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसकडून पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तौते चक्रीवादळामध्ये हा तराफा भरकटला आणि बुडाला असं सांगण्यात येत असून त्यानंतर भारतीय नौदलाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अजूनही उरलेल्या कर्मचाऱ्यांसा शोध सुरू असल्याचं नौदलाकडून सांगण्यात आलं आहे.

काय घडलं बॉम्बे हायजवळ?

चक्रीवादळामुळे सोमवारी बॉम्बे हायनजीक ‘पी ३०५’ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावरील २६१ कर्मचाऱ्यांनी प्राण वाचविण्यासाठी जीवरक्षक जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. त्यातील १८० कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. उर्वरित बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध मंगळवारी रात्रीपर्यंत लागला नव्हता. मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी दिवसभरात अजून आठ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाला यश मिळाले. त्यामुळे एकूण वाचवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १८८ झाली आहे. त्यातील सहा कर्मचारी ‘पी- ३०५’ तराफ्यावरील असून, दोघेजण ‘वरप्रदा’ नौकेवरील आहेत. ‘पी-३०५’ तराफ्यावरील २६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप ४९ जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

नैतिक जबाबदारी स्वीकारून…

दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याचा तपास करण्यासाठी केंद्रीय पेट्रेलियम विभागाकडून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळे दावे समोर येत असताना आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ही पूर्णपणे मानवनिर्मित दुर्घटना असल्याची टीका केली आहे. “तौते चक्रीवादळात ओएनजीसीचा तराफा डुबल्यामुळे ३७ जणांचे प्राण गेले आहेत. ही नक्कीच मानवनिर्मित दुर्घटना आहे यात कोणतीही शंका नाही. तौते चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा आधीच सगळ्यांना दिला होता. तरी ज्या लोकांनी या ७००हून जास्त लोकांचे प्राण धोक्यात घातले, त्या सगळ्यांवरच कारवाई व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. या सगळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

 

मोदी सरकार कधी शिकणार?

पी-३०५ तराफ्याला झालेल्या दुर्घटनेवरून सचिन सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “जवळपास देशभरात लाखो लोकांचे प्राण मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळे गेले आहेत. करोना संकट त्यांना नक्कीच हाताळता आलेलं नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले आहेत. हा निष्काळजीपणा वेगवेगळ्या विभागात दिसून येत आहे. ही दुर्घटनाही त्याच निष्काळजीपणामुळे घडली आहे. मोदी सरकार आपल्या गंभीर चुकांमधून कधी शिकणार?” असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

उच्चस्तरीय समिती महिन्याभरात सादर करणार अहवाल!

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कोण हे शोधण्याचं काम पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवलं आहे. या समितीमध्ये शिपिंगचे महासंचालक अमिताभ कुमार, हायड्रोकार्बन्सचे महासंचालक एससीएल दास आणि संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव नाझली जाफरी शायीन यांचा या समितीमध्ये समावेश आहे. नेमका हा तराफा बुडाला, तेव्हा घडलं काय? याची चौकशी या समितीमार्फत केली जाणार आहे. महिन्याभरात ही समिती आपला अहवाल सागर करणार आहे. या चौकशीदरम्यान नवीन आवश्यक सदस्याचा समावेश किंवा सदस्य नसलेल्या तज्ज्ञाचा सल्ला समिती घेऊ शकते, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 4:13 pm

Web Title: congress leader sachin sawant slams modi government on barge p 305 incident pmw 88
Next Stories
1 विरार : करोना केंद्रातून पळालेल्या करोनाबाधिताचा आढळला मृतदेह!
2 “महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
3 राज्याने शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रूपये अनुदान द्यावे – केशव उपाध्ये
Just Now!
X