साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हल्लाबोल

मुंबई : दहशतवादी ते भाजप उमेदवार या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा फाटला असून महाराष्ट्राचे थोर सुपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला

प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.  प्रज्ञासिंह यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि शहिदांचा अवमान आहे. शहिदांच्या शौर्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि भाजपने तात्काळ माफी मागावी आणि प्रज्ञा ठाकूर यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी त्यांना उमेदवारी देऊन आतंकवादाला खतपाणी घातले आहे, असाही आरोप  या वेळी करण्यात आला.

भाजपने शहीद करकरेंना देशद्रोही ठरवल्याने त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड वेदना होत असतील. काँग्रेस पक्ष करकरे कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे सावंत म्हणाले.

‘दहशतवादाला समर्थन’

नवाब मलिक म्हणाले की, भाजपने साध्वी प्रज्ञासिंह  यांना उमेदवारी देऊन दहशतवादाला समर्थन दिले आहे  हे स्पष्ट होत असून साध्वीच्या रूपाने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजप आतंकवादाशी लढत असल्याचे ढोंग करत आहे हे स्पष्ट असून भाजपचा खरा चेहरा उघडा पडला आहे.

निष्ठावान अधिकारी

माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर म्हणाल्या की, ‘‘मी करकरेंना वीस वर्षे ओळखत होते. ते अत्यंत सज्जन आणि निष्ठावान अधिकारी होते. त्यामुळे ठाकूर यांच्या विधानाने मी अत्यंत व्यथित झाले. भारतीय संस्कृतीला न शोभणारे वक्तव्य एका साध्वीने करावे, हेच धक्कादायक आहे.’’

करकरे सच्चा हिंदू- रिबेरो

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो म्हणाले की, ‘‘कृष्णानं अर्जुनाला निमित्तमात्र होऊन युद्ध करायला जसं सांगितलं त्याच तटस्थतेनं करकरे यांनी मालेगाव प्रकरणाचा तपास केला. एक सच्चा हिंदू म्हणून  त्यांनी आपले कर्तव्य बजावले. त्यामुळेच हे वक्तव्य अवमानकारक आहे.’’