विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी गुरूवारी काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे यांचे नाव जाहीर करण्यात आले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेच्या उपसभापतींची निवड करण्याचे ठरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसशी झालेल्या समझोत्यानुसार हे पद काँग्रेसला देण्याचे ठरले असून त्यासाठी पक्षात मोठी चुरस निर्माण झाली होती. या पदासाठी काँग्रेसतर्फे मराठवाडयातील ज्येष्ठ सदस्य दिलीपराव देशमुख यांच्यासह नांदेडचे अमरनाथ राजूरकर यांची नावे चर्चेत होती. राष्ट्रवादीने काँग्रेसला विधान परिषदेचे उपसभापतीपद देण्याचे मान्य केल्यानंतर आमदार राजूरकर यांनी मागील महिन्यापासून मोर्चेबांधणी सुरू केली होती. काँग्रेस श्रेष्ठींच्या निकटवर्तीयांपर्यंत त्यांचे नाव पूर्वीच गेले होते. खासदार अशोक चव्हाण यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत. चव्हाण यांनी गेल्या महिन्यात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये भव्य कार्यक्रम घेतला होता. चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने त्यांचा कल कोणाच्या बाजूने आहे, हे पाहून काँग्रेसश्रेष्ठी वरील पदाचा उमेदवार ठरवतील, असा अंदाज होता. मात्र, या शर्यतीत माणिकराव ठाकरे यांनी बाजी मारली आहे.
गेल्याच महिन्यात विधान परिषदेच्या सभापती पदासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांची फेरनिवड करण्यात आली होती, तर सभागृह नेतेपद चंद्रकांत पाटील यांना मिळाले होते. उपसभापती पदाची निवडणूक ही सभापती जाहीर करतात. हंगामी सभापतींकडून ही निवडणूक घेतली जात नाही. यामुळेच उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली नव्हती.

विधान परिषदेतील पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस २६
काँग्रेस १९
भाजप १६
शिवसेना
अपक्ष ६
इतर ३