विधानसभा निवडणूक एकत्र लढवू असा निर्वाळा आघाडीच्या नेतृत्वाकडून दिला जात असला तरी  कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये शक्तीचे प्रयोग सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीची तिरकी चाल लक्षात घेता काँग्रेसने सर्व २८८ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असून, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांना भेटण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आज दिवसभर विविध वावडय़ा उठल्या होत्या. मुख्यमंत्री बदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली, तर राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल केले जाणार असल्याचा दावा केला जात होता. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे परदेशातून बुधवारी परतले आणि नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली. प्रदेश काँग्रेसच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. सर्व २८८ मतदारसंघांतील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समन्वयांची नियुक्ती करण्यात आल्याचे
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. आघाडी कायम राहणार असली तरी सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये काहीशी साशंकता आहे. यामुळेच काँग्रेसने सर्व जागांची तयारी करण्यावर भर दिला आहे. समन्वयकांवर पक्ष संघटनेचा आढावा घेण्याची जबाबदारी असून, संभाव्य उमेदवारांची नावे सुचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही, असे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित प्रश्न सोडविण्याकरिता शरद पवार आणि मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात दोन दिवस बैठका झाल्या. आगामी निवडणुकीत जागा वाढवून मिळाव्यात म्हणून पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी जाहीर केले होते. शरद पवार हे नवी दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्याकरिता बसपानेही बरोबर यावे, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.