शिवसेना-काँग्रेसची हातमिळवणी, भाजपला धक्का
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात मेट्रो रेल्वे-३ प्रकल्पाला जमीन देण्याचा प्रस्ताव बुधवारी उधळण्यात आला. यामुळे या प्रस्तावाला विरोध असणाऱ्या शिवसेनेने काँग्रेसच्या साथीने भाजपला धक्का दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. मात्र, मेट्रो प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमधील मतभेद उघड झाले आहेत.
मुंबई मेट्रो रेल्वे -३ प्रकल्पात दक्षिण मुंबई, वरळी, दादर भागातील १७ भूखंड कायमस्वरूपी वापरण्यात येणार आहेत. पण, याला शिवसेनेचा विरोध असल्याने भाजपाचे नगरसेवक सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी काँग्रेसला हाताशी धरून या प्रकल्पाला जमीन देण्याच्या प्रस्तावाला सुधार समितीत मंजुरी दिली. त्यामुळे याला उत्तर देण्याची तयार शिवसेनेने करत बुधवारी हा प्रस्ताव सभागृहात आणण्याची कल्पना शिवसेनेने भाजपला दिली. त्याप्रमाणे महापौरांच्या दालनात साडेपाच वाजता हा प्रस्ताव घेण्यात येणार होता. पण, सभागृह सुरू झाल्यानंतर अन्य कामकाजाबरोबर मेट्रो-३ च्या प्रस्तावाची घोषणा महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली. त्यानुसार भाजपने हा प्रस्ताव वाचून दाखविला. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली. प्रस्ताव दप्तरी दाखल व्हावा ही शिवसेनेची इच्छा असल्याने महापौरांनी उपसूचना मंजूर करत मूळ प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यासाठी सभागृहाची मंजुरी मागितली. यावेळी कोणत्याच सदस्याने विरोध न केल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या साथीने आपल्याला धक्का दिल्याचे भाजपच्या सदस्यांच्या लक्षात आले. यावर, शिवसेना-काँग्रेसच्या अभद्र युतीमुळे हा मेट्रो-३ प्रकल्प रखडणार आहे. पण, भाजप हे होऊ देणार नाही. मुंबईच्या विकासांत आडवे येणाऱ्यांना कायम विरोध करू असे मत भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केले. मात्र, उपसूचना मांडली असता भाजपने विरोध का केला नाही असा सवाल उपस्थित करत भाजपने गप्प राहून या उपसूचनेला समर्थनच दिल्याचे मत विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी व्यक्त केले.