तेराव्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपाची सरकार स्थापन्याची तयारी आहे का, अशी विचारणा करणारे पत्र शनिवारी राज्यपालांनी भाजपाला पाठवले आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर राजकीय हलचालींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपामधील मुख्यमंत्रीपदाचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामध्ये आता काँग्रेस पक्षानं उडी घेतली आहे.

भाजपा सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यास राज्यपालांनी सत्तास्थापन करण्यासाठी आघाडीला निमंत्रण द्यायला हवं. त्यावेळी जर शिवसेनेने पाठिंबा दिला तर आम्ही सरकार स्थापन करू, असं वक्तव्य काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी बोलताना देवरा म्हणाले की, जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या या मोठ्या वक्तव्यानंतर राज्यकीय चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात मतदान करेल असे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. सत्तास्थापनेवेळी जर युतीमधील पेच न सुटल्यासभाजपा सरकार पाडण्यासाठी शिवसेना विरोधात मतदान करणार का, हे आम्हाला पाहायचे आहे. तसे झालेच तर नंतर पर्यायी सरकार कसे देता येईल, याचा विचार राष्ट्रवादी करेल, असे नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडे बहुमताचा आकडा आहे की नाही, याची राज्यपालांनी खात्री करून घ्यायला हवी नाहीतर सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार मांडला जाण्याची भीती आहे, असेही मलिक म्हणाले.