एखादा गुन्हा करण्यापूर्वी गुन्हेगार कट रचतो आणि ठरल्याप्रमाणे गुन्हा करतो. अनेकदा गुन्ह्य़ाच्या कार्यपद्धतीमुळे पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटते, मात्र कटातील काही चुकांवर पोलिसांची नजर पडते आणि गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडतो. अशीच काहीशी घटना चार महिन्यांपूर्वी भिवंडीत घडली..

भिवंडी शहरातील पाच महिन्यांपूर्वीचा प्रसंग. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. या महामार्गावरील भिवंडी परिसरातील रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. एका वाहनचालकाची त्यावर नजर पडली आणि त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नारपोली पोलीस ठाण्याच्या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी मृतदेहाची तसेच आसपासच्या परिसराची पहाणी केली. मृताच्या नावाची ओळख पटविण्यासंबंधी कोणतेही ओळखपत्र किंवा कागदपत्रे सापडली नव्हती. मात्र त्याच्या खिशात ऑनलाइन लॉटरीचे एक तिकीट सापडले होते. जेमतेम ३१ वर्षांचा हा तरुण होता. महामार्गावरील रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा आणि या घटनेनंतर चालक वाहनासहीत पळून गेला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला.
मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. त्यामुळे पोलिसांची पथके मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम करीत होते. त्याच वेळी शासकीय रुग्णालयातून मृताचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आणि तो पाहून पोलीसही चक्रावले. मृत व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. या अहवालाच्या आधारे पोलिसांनी अपघाताऐवजी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि या खुनाचा उलगडा करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाचे कोणतेही धागेदोरे हाती नसतानाही भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी.शिवथरे यांच्या पथकाने या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला. या पथकात साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण श्रीरसागर, पोलीस हवालदार एस.एस.भोसले आणि पोलीस नाईक एस.एस. मोहिते यांचा समावेश होता.
मृताच्या खिशात सापडलेले ऑनलाइन लॉटरीचे तिकीट हे नवी मुंबईतील तुर्भे भागातील दुकानातील होते. या दुकानातून मोहम्मद कमाल मोहम्मद कासम शेख (३१) नावाच्या व्यक्तीने हे तिकीट घेतले होते. बांग्लादेशातील हा नागरिक होता. त्याच्याविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात परकीय नागरी कायदा कलमान्वये गुन्हाही दाखल होता. बांग्लादेशातील सारशा तालुक्यातील एका पारपत्र दलालाच्या माध्यमातून पोलिसांनी त्याचा भाऊ युनीस शेखचा क्रमांक मिळविला आणि त्याच्याशी संपर्क साधून त्याच्या कुटुंबीयांची माहिती घेतली. तसेच मोहम्मदची पत्नी जोरना शेख हिला सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मोहम्मदचे फोटो आणि त्याचे कपडे पाठवून पोलिसांनी तो मोहम्मदच असल्याची खात्री केली. मात्र, त्याव्यतिरिक्त ती गुन्ह्य़ाच्या तपासात फारशी सहकार्य करत नसल्यामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी तिच्या मोबाइल क्रमांकाचे कॉल डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली आणि तिथेच खऱ्या अर्थाने गुन्ह्य़ाच्या तपासाला दिशा मिळाली.
तिच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्स यादीत तुर्भेतील अमजद मोहम्मद कासीम शेख याचा क्रमांक होता. घटनेच्या दिवशी दोघांचे एकमेकांशी बोलणे झाले होते. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून अमजदला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यामध्ये त्याने तुर्भेतील मिठाई दुकानाचा मालक संतोष राय याच्यासोबत जोरनाचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संतोषला ताब्यात घेऊन त्याची सविस्तर चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. जोरणा ही तुर्भे भागात राहात होती आणि बारमध्ये काम करीत होती. चार वर्षांपासून तिचे संतोषसोबत अनैतिक संबंध होते. मोहम्मद हा दारूच्या नशेत तिला मारझोड करायचा. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आल्याचे संतोषने पोलिसांना सांगितले. जोरना आणि मोहम्मद हे दोघे बांग्लादेशात गेले होते, मात्र तिच्यासोबत सोशल नेटवर्किंग साइटवर संपर्क व्हायचा. याच साइटवर दोघांनी मोहम्मदच्या खुनाचा कट रचला आणि ठरल्याप्रमाणे तिने त्याला भारतात पाठविले. इथे आल्यानंतर त्याला दारू पाजून एका रिक्षातून मुंबई-नाशिक महामार्गावर नेले आणि तिथे त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.