माहितीच्या अधिकारात ज्यांना माझ्या दहावी आणि बारावीच्या शिक्षणाचे गुणपत्रक उपलब्ध झाले नाही, त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. मी त्यांना हवे असलेले गुणपत्रक उपलब्ध करून देईन, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी स्पष्ट केले. विनोद तावडे यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपासणीच्या उद्देशाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत एका याचिकाकर्त्याने तावडेंच्या गुणपत्रिकेची मागणी केली होती. मात्र, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तावडेंची गुणपत्रिका देण्यास स्पष्ट नकार दिला. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार दहावी अथवा बारावीच्या गुणपत्रिकेची प्रत ही फक्त संबंधित उमेदवारालाच मिळू शकते. त्रयस्थ व्यक्तीला गुणपत्रक देण्याची तरतूद मंडळाच्या नियमात नसल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱयांनी नमूद केल्याचे यावेळी विनोद तावडे यांनी निदर्शनास आणून दिले आणि ज्यांना माझी गुणपत्रिका पाहायची असेल त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे विनोद तावडे म्हणाले