राज्यातील विविध आस्थापना, कंपन्या यांना कंत्राटी कामगार कायदा लागू करण्याची मर्यादा आता २० वरून ५० करण्यात आली आहे. उद्योगपूरक धोरणाला अनुसरून अन्य काही राज्यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी कायद्यात दुरूस्तीसाठी आग्रह धरला होता. त्या विधेयकास विधानसभेत सोमवारी रात्री उशिरा मंजुरी देण्यात आली.

आता कंत्राटी कामगार कायद्यातील तरतुदी लागू होण्यासाठी किमान कामगारांची संख्या २० वरून ५० झाल्याने निम्म्याहून अधिक आस्थापना व कंपन्याना लाभ होणार आहे. ही दुरूस्ती कामगार हिताविरोधात असल्याची टीका या वेळी विरोधकांनी करत त्यास विरोध केला. लाखो कंत्राटी कामगारांच्या हक्कांना बाधा पोचविणारे हे विधेयक सोमवारी रात्री उशिरा मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.