संदीप आचार्य

मुंबईत आणि राज्यातील काही जिल्ह्यात ज्या वेगाने करोनाचे रुग्ण वाढत आहेत ते पाहाता जास्तीतजास्त चाचण्या करण्याची तसेच रुग्ण संपर्कातील किमान वीस व्यक्तींना शोधण्याची गरज असल्याचे राज्य कृती दलाचे सदस्य व विख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी सरकारने लसीकरणाचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असल्याचेही डॉ. जोशी म्हणाले.

मुंबईत करोना रुग्ण वाढण्याला तीन प्रमुख कारण आहेत. या लोकल ट्रेन सुरु झाल्यामुळे जसा करोना वाढला तसेच पुरेशा चाचण्या व रुग्ण संपर्कातील लोक शोधण्यातील ढिलाई कारणीभूत आहे. लोकांनी मास्कचा वापर करावा तसेच लग्न समारंभांदी कार्यक्रम आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्याचे आदेश केवळ कागदावरच राहिले. महापालिका व पोलिसांनी त्याची काटेकोरपण अंमलबजावणी केली असती तर मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात राहिली असती असे डॉ. शशांक जोशी म्हणाले.

रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढविली तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवताना मास्क आदी सुरक्षेचे नियम अत्यंत कठोरपणे पाळले जातील याची जबाबदारी आता संबंधित यंत्रणेला घ्यायवीच लागेल. आज ३५ ते ४० लाख लोक रोज रेल्वेने प्रवास करत असून करोनावर मात करायची असेल तर नावापुरता कापडी मास्क न घालता डबल मास्क घातला पाहिजे.

महापालिकेने मुंबईत पुन्हा एकदा सिरो सर्व्हे करणे गरजेचे असून रुग्ण संपर्कातील लोकांचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला पाहिजे. सर्दी- खोकला झाला म्हणून जे लोक दुर्लक्ष करतात त्यांनीही करोना चाचणी केली पाहिजे असे डॉ. जोशी यांनी सांगितले. मुंबईत काल ८२३ रुग्ण सापडले असून आतापर्यंत ११,४३७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या आठवडाभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून करोना नियंत्रित करायचा असेल तर व्यापक चाचण्या, रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध तसेच मास्कची काटेकोरपणे अंमलबजावणी व लग्नसमारंभादी कार्यक्रमांवर कठोर नियंत्रण आणावेच लागेल.

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड,बीड, अमरावती व सातारा जिल्ह्यात सरासरी दैनंदिन मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात करोनाचे प्रमाण वाढले असून ग्रामपंचायत निवडणुका, राजकीय मेळावे तसेच मोठ्या प्रमाणात होणार्या लग्नसमारंभात लोकांनी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीत अमरावती, यवतमाळ व सातारा येथे तीन स्ट्रेन सापडले असून हे बाहेरील स्ट्रेन नाहीत असेही डॉ जोशी म्हणाले.

मात्र यापुढे अधिक सतर्क राहाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात काल २० लाख ८७ हजार ६३२ करोना रुग्णांची नोंद होती तर कालच्या दिवशी ६११२ नवीन करोना रुग्ण आढळून आले. एकूण ५१,७१३ लोकांचा मृत्यू झाला असून देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र रुग्ण संख्या व मृत्यू संख्या जास्त आहे.

करोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर हा १.४२ टक्के आहे तर महाराष्ट्रात २.४८ एवढा मृत्यूदर आहे. राज्याची ही परिस्थिती लक्षात घेता केंद्राने महाराष्ट्राला सर्वार्थाने जास्तीची मदत केली पाहिजे, असेही डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. राज्यात लॉकडाऊनची गरज पडणार नाही मात्र छोटे कंटेनमेंट झोन करावे लागतील. करोनाच्या सर्व हॉटस्पॉटना कंटेनमेंट झोनमध्ये टाकल्यानंतरही तेथे काटेकोर अंमलबजावणी होते की नाही यावर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.