|| संदीप आचार्य

मुंबई: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी चार नवीन जम्बो रुग्णालय उभारताना ही रुग्णालये एक वर्षाहून अधिक काळ टिकतील अशा त्याची रचना असणार आहे. तसेच या सर्व रुग्णालयात लहान मुलांसाठी किमान ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार २५० खाटा करता येतील, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने जम्बो रुग्णालयांची क्षमता वाढविण्याचा तसेच बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. सध्या पालिकेच्या आठ जम्बो करोना रुग्णालयात मिळून १०,८३० खाटा आहेत. यात अतिदक्षता विभागात ८७२ तर व्हेंटिलेटरच्या ५७४ खाटा आहेत. ही जम्बो रुग्णालये उभारताना साधारणपणे सहा महिने कालावधीचा विचार करून उभारण्यात आली होती. अलीकडे झालेल्या दोन चक्रीवादळानंतर या आठही जम्बो करोना रुग्णालयांचे नव्याने मजबुतीकरणाचे काम करण्यात येत आहे. यात बीकेसी, नेस्को टप्पा एक व दोन, दहिसर येथील  दोन, नेस्को, डोम, मुलुंड व सेव्हन हिल्सचा समावेश आहे.

आता नव्याने मालाड, कांजुरमार्ग, शीव व महालक्ष्मी येथे जम्बो रुग्णालये उभारण्यात येत असून याठिकाणी ७० टक्के ऑक्सिजन खाटा व १० टक्के अतिदक्षता विभागासाठी खाटा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे  काकाणी यांनी सांगितले.

पालिकेकडून नियोजन

तिसऱ्या लाटेत लहान मुलांची संख्या वाढेल हे तज्ज्ञांचे म्हणणे लक्षात घेऊन मुंबईतील २४ विभागात बालरोगतज्ज्ञ तसेच अन्य डॉक्टरांबरोबर आमच्या बैठका सुरु आहेत. लहान मुलांसाठीच्या कृती दलाकडून येणाऱ्या सूचना तसेच करावयाचे उपचार याची माहिती सातत्याने मुंबईतील सर्व संबंधित डॉक्टरांना कळवली जाणार आहे. बालरोगतज्ज्ञ तसेच पालिकेचे विभागातील संबंधित अधिकारी यांच्याही विभागनिहाय बैठका सुरु झाल्या आहेत. मधल्या काळात रुग्ण वाढीमुळे  प्राणवायूची समस्या निर्माण झाली होती. तेव्हा २५० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज लागायचा सध्या रुग्ण संख्या कमी झाल्याने १३० मेट्रिक टनांपेक्षा कमी प्राणवायू लागत आहे. प्राणावायूची कमतरता भासणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली असल्याचे काकाणी यांनी सांगितले. त्याचबरोबर प्राणवायूचा वापर नेमका किती व कसा करायचा तसेच तो वाया जाऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याचही मार्गदर्शन संबंधितांना करण्यात आले आहे. रेमडेसिवीरपासून म्युकरमायकोसिसच्या औषधांपर्यंत कशाचीही कमतरता नसेल असे त्यांनी स्पष्ट केले.