|| मानसी जोशी
करोनामुळे चित्रविक्री ठप्प; कला दालने सुरू करण्याची चित्रकारांकडून मागणी
मुंबई : करोनामुळे पाच महिन्यांपासून शहरातील कलादालने बंद असल्याने प्रदर्शनाद्वारे होणारी चित्रविक्री पूर्णपणे बंदच आहे. याचा फटका चित्रकारांना बसतो आहे. ऑनलाइन आयोजिलेल्या ‘व्हर्च्युअल’ प्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद आहे. त्यामुळे शहरातील कला दालने सुरू करण्याची मागणी चित्रकारांकडून केली जात आहे.
मुंबईत ‘जहांगीर’, ‘चेमुल्ड पॅस्कॉट रोड गॅलरी’, ‘द पॅव्हिलियन’, ‘वोल्टे’, ‘आर्टिक्वेस्ट’ या आघाडीच्या कला दालनात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांची चित्र प्रदर्शने आयोजित केली जातात. त्यातील चित्रे आवडल्यास कलासक्त मंडळी ती खरेदीही करतात. मात्र, करोनामुळे कलादालने बंद असल्याने ही चित्रविक्री ठप्प आहे. करोनामुळे ही परिस्थिती ओढावल्याने ‘साक्षी’, ‘ताओ’, ‘आकार आर्ट’, ‘गॅलरी ७’, ‘दिल्ली’ या कलादालनांनी ‘व्हर्च्युअल’चित्रप्रदर्शने भरवली आहेत. मात्र या चित्रप्रदर्शनांना कलाप्रेमींकडून प्रतिसाद नाही. चित्रविक्री होतच नसल्याने चित्रकारांची अवस्था बिकट झाली आहे.
जे. जे. कला महाविद्यालयात प्राध्यापक असलेले शार्दूल कदम यांनी नुकतेच निप्पॉन कलादालनाद्वारे आयोजित ‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनात क्युरेटर म्हणून काम केले. ‘आधी प्रदर्शनात ३० टक्के चित्रांची विक्री होत असे. मात्र आता ‘व्हर्च्युअल’ प्रदर्शनात चित्रांची विक्री होईल, याची शाश्वती नाही. अनेक कलाप्रेमी ऑनलाइन चित्रे पाहून त्यासंबंधी विचारणा करतात. मात्र खरेदी करत नाहीत. आर्थिक मंदीसदृश वातावरणाचा चित्रविक्रीवर परिणाम होत आहे. मुंबईतील कलादालने जोपर्यंत खुली होत नाही तोपर्यंत चित्रविक्रीला चालना मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
करोनामुळे अनेक चित्रकारांचे दौरे, प्रदर्शनेही रद्द झाली आहेत. चित्रकार राजू सुतार यांनी मुंबईत गिरणी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे ‘रायगड अॅक्टिव्हिस्टा’ चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शन भरवले होते. हेच प्रदर्शन पुढे पुणे, नाशिक यांसह सहा शहरांत आयोजित केले जाणार होते. मात्र, टाळेबंदीमुळे पुढील सर्व प्रदर्शने त्यांनी रद्द केली.
‘करोनासारख्या संकटमय परिस्थितीमध्ये कला ही अत्यावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे चित्रकलेला सर्वात शेवटचे स्थान आहे. लोकप्रिय चित्रकारांच्या चित्रांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्या तुलनेने छोट्या-मोठ्या चित्रकारांची परिस्थिती बिकट असल्याचे मत सुतार यांनी व्यक्त केले.
‘जहांगीर’सारख्या लोकप्रिय कलादालनात प्रदर्शन भरवायचे असल्यास सहा महिने वाट पहावी लागते. या दोन ते तीन महिन्यांत माझी चार प्रदर्शने होणार होती. मात्र, टाळेबंदीमुळे ती रद्द करावी लागली, असे देविदास आगाशे यांनी स्पष्ट केले. सध्या ‘व्हर्च्युअल’ प्रदर्शनामुळे चित्रकारांना चित्रांसाठी व्यासपीठ निर्माण झाले असले तरी नेहमीपेक्षा प्रेक्षकांचा नगण्य प्रतिसाद असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
उदरनिर्वाहसाठी अन्य कामे
करोनामुळे चित्रविक्री ठप्प असल्याने चित्रकार उदरनिर्वाहासाठी इतरही कामे करत आहे. चित्रकार भूषण भोंबाळे सध्या एका रिअॅलिटी शोसाठी संकलनाचे काम करत आहेत. दर महिन्याला चित्रकला वर्ग आणि प्रदर्शन याद्वारे तीस हजार रुपयांची कमाई व्हायची. मात्र, काही काम नसल्याने घराचे पाच महिन्यांचे भाडेही द्यायला पैसे नाही, असे ते सांगतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 25, 2020 12:55 am