करोनावरील लस मुंबईकरांसाठी उपलब्ध होताच अवघ्या २४ तासांच्या पूर्वसूचनेने प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यात येईल, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

करोना विषाणूवरील लसीकरणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी काकाणी यांनी शनिवारी प्रादेशिक लस साठवणूक केंद्रासह विविध रुग्णालयांत निर्मित लसीकरण केंद्रांना भेट दिली. तांत्रिक बाबी, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण यांसह निरनिराळ्या बाबींचा आढावा घेऊन त्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्याचबरोबर लसीकरणाच्या पूर्वतयारीत कोणतीही उणीव राहू नये याची खातरजमा करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

केईएम, शीव, नायर, कूपर, भाभा, राजावाडी, व्ही. एन. देसाई रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही आठ लसीकरण केंद्रे नियोजित आहेत. तसेच लसीकरणासाठी कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच हजार चौरस फूट जागेत प्रादेशिक लस साठवणूक केंद्र (आरव्हीएस) आकाराला येत आहे. काकाणी यांच्यासोबत पाहणी दौऱ्यात उपायुक्त देविदास क्षीरसागर, संचालक (वैद्यकीय शिक्षण) डॉ. रमेश भारमल, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे सहभागी झाले होते.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर स्थिर

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्ण दुप्पटीच्या काळात सतत घसरण होतच आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्य़ांवर स्थिर असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मुंबईत शनिवारी ५९२ जणांना करोनाची बाधा झाल्याची नोंद झाली, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला.

गेले काही दिवस सातत्याने नव्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात चढ-उतार होत आहेत. ते अत्यल्प आहेत. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन लाख ९४ हजार ६५९ वर पोहोचली आहे. मुंबईतील बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून २४ तासांत विविध रुग्णालयांत सहा पुरुष आणि एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत ११ हजार १३२ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ६९५ रुग्ण दिवसभरात करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ७४ हजार ७६७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये सात हजार ८९२ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबईमधील करोना दुप्पटीचा काळ शनिवारी सरासरी ३६१ दिवसांवर घसरला. गेल्या काही दिवसांपासून ही घसरण सुरू आहे. मात्र करोना रुग्णवाढीचा दर ०.२१ टक्क्य़ांवर स्थिर आहे. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने आतापर्यंत २३ लाख ८२ हजार ४२० चाचण्या केल्या आहेत.

रुग्ण सापडल्यामुळे टाळेबंद करण्यात येणाऱ्या इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही आता कमी होत आहे. आजघडीला दोन हजार ४६२ इमारती टाळेबंद, तर २८३ परिसर प्रतिबंधित आहेत. गेल्या २४ तासांमध्ये पालिकेने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील दोन हजार ८९५ संशयीत रुग्णांचा शोध घेतला.