04 June 2020

News Flash

उद्धव आले आणि गेले, पण नगरसेवक हिरमुसले!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी पालिका मुख्यालयासमोर आले..

पक्षप्रमुख भेटीची नगरसेवकांची मनीषा धुळीस मिळाली. आता भविष्यात भेटीचा योग कधी येणार, असा विचार करीत नगरसेवकांनीही घरची वाट धरली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी पालिका मुख्यालयासमोर आले.. स्वातंत्र्ययुद्ध स्मृती स्मारकाला अभिवादन करून आपल्या गाडीतून भुर्रकन निघून गेले. पक्षादेश हाती पडताच पक्षशिस्त बाळगून सकाळपासून पालिका मुख्यालयाबाहेर ताटकळत उभ्या राहिलेले शिवसेनेचे नगरसेवक मात्र पक्षप्रमुख न भेटताच निघून गेल्यामुळे हिरमुसले. पक्षप्रमुखांकडे आपली गाऱ्हाणी मांडण्याची संधी हुकल्याचे शल्य प्रत्येक नगरसेवकांच्या मुखावर दिसत होते.
‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी पालिका मुख्यालयात येणार आहेत. त्यामुळे सर्वानी गुरुवारी १०.३० वाजता आवर्जून पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात हजर राहावे,’ हा पक्षादेश बुधवारी दुपारी हाती पडला आणि पक्षप्रमुख आपल्याला भेटणार या आनंदाने नगरसेवक भारावून गेले. उद्धव ठाकरे कशासाठी येणार याची कुणालाच कल्पना नव्हती. अनेकांनी सेना भवनात, वरिष्ठ नेत्यांकडे कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. पण कुणीच नगरसेवकांना ताकास तूर लागू दिली नाही. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता उद्धव ठाकरे भेटल्यावर त्यांच्याकडे आपली गाऱ्हाणी मांडता येतील, स्वपक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांकडून मिळणारी वागणूक, भाजपचा वाढता प्रभाव याबद्दल बोलता येईल असे अनेक नगरसेवकांना वाटले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढत गुरुवारी शिवसेनेचे सर्व नगरसेवक १०.३० च्या ठोक्याला पालिका मुख्यालयात हजर झाले. एरवी केवळ कार्यालयाची वेळ चुकू नये म्हणून मुख्यालयात सकाळी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असते. पण आज नगरसेवकांना पाहून कर्मचारी गोंधळले. पालिका सभागृहाची बैठक नसताना शिवसेनेचे नगरसेवक कसे काय आले अशी चर्चा पालिकेत सुरू झाली.
आझाद मैदानाजवळील स्वातंत्र्ययुद्ध स्मृती स्मारकाला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे येणार असल्याचा उलगडा नगरसेवकांना मुख्यालय मुक्कामी पोहोचल्यावर झाला. पण उद्धव ठाकरे किमान महापौरांच्या दालनात किंवा पक्ष कार्यालयात येतील, तेव्हा त्यांच्याशी बोलता येईल, असा नगरसेवकांचा समज झाला. महापौर स्नेहल आंबेकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्यासह समस्त नगरसेवकगण पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी मुख्यालयाबाहेर येऊन थांबले होते. कार्यक्रमाची वेळ टळली आणि उन्हाचा तडका वाढू लागला. मात्र तरीही नगरसेवक प्रतीक्षेत ताटकळत होते. अखेर सर्वाची प्रतीक्षा संपली आणि दुपारी १२ च्या सुमारास उद्धव ठाकरे आले. उन्हात ताटकळून मरगळलेल्या नगरसेवकांनी त्राण एकवटून शिवसेनेचा गजर केला. उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्ययुद्ध स्मृती स्मारकाला अभिवादन केले आणि नगरसेवकांकडे दृष्टिक्षेप टाकत पुन्हा गाडीत बसले. गाडी ‘मातोश्री’च्या दिशेने मार्गस्थ झाली आणि पक्षप्रमुख भेटीची नगरसेवकांची मनीषा धुळीस मिळाली. आता भविष्यात भेटीचा योग कधी येणार, असा विचार करीत नगरसेवकांनीही घरची वाट धरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2015 4:07 am

Web Title: corporator not happy on uddhav thackeray
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 पाण्यासाठी रहिवाशांची रोजच ‘कोजागिरी’
2 रागाला आवर घालता येणे हा विकास
3 ‘गुगल हँगआऊट’द्वारे मुख्यमंत्री, संपादकांशी संवाद
Just Now!
X