चर नीट न बुजवल्यामुळे पाणी झिरपून रस्ते खराब

मुंबईत केवळ रस्तेच नव्हे तर दूरध्वनी, गॅसवाहिनी आदी सेवा वाहिन्यांकरिता रस्त्यांच्या बाजूला खोदलेले चर बुजविण्याच्या कामातही हयगय होत असल्याचे आढळून आले आहे. वर्षभरात संपूर्ण शहरात तब्बल ३७० किलोमीटर लांबीचे चर खणले गेले होते. परंतु, यापैकी बहुतेक चर योग्य पद्धतीने बुजविले न गेल्याने त्यात पाणी शिरून मुख्य रस्ते खराब होण्याची शक्यता आहे.

चर खोदण्यासाठी पालिका सेवा कंपन्यांकडून कोटय़वधी रुपये शुल्क वसूल करत असली तरी चर बुजवताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांचे बांधकाम धोक्यात येत आहे. नवीन रस्ते खराब झाल्यास त्याची जबाबदारी रस्ते अभियंत्यांवर निश्चित करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांच्या कडेला खणण्यात आलेल्या चरांविषयी फारसे काही बोलले जात नाही.

ऑक्टोबरपासून विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याकडेला तब्बल ३६० किलोमीटर लांबीचे चर खणले गेले. दरवर्षी साधारण ३५० ते ४०० किलोमीटर लांबीचे चर खणले जातात. मुंबईतील सर्व रस्त्यांची एकूण लांबी १९०० किलोमीटर असून चर्चगेट ते बोरिवली हे अंतर साधारण ३५ किलोमीटर आहे, हे लक्षात घेतल्यास या चरांची लांबी लक्षात येईल. चर खणण्यासाठी विभाग कार्यालयाकडून परवानगी दिली जाते. रस्ता नवीन असल्यास सेवा कंपनीकडून चौपटीने शुल्क वसूल केले जाते. अशा रीतीने पालिकेकडे दरवर्षी ८० ते १०० कोटी रुपये जमा होतात. त्यानंतर हे चर नीट बुजवून रस्ता समतल करण्याची जबाबदारी विभाग कार्यालयांकडे असते. मात्र हे चर योग्यरीतीने बुजवले जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात या भागातून रस्त्यांमध्ये पाणी शिरून त्याच्या बांधकामाचा साचा डळमळीत होतो व सततच्या वाहतुकीमुळे त्यावर खड्डे पडतात, त्यामुळे नवीन रस्त्यांनाही खड्डे पडण्याच्या घटना घडतात, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

चर बुजवण्याची जबाबदारी विभागातील साहाय्यक आयुक्तांनी घ्यावी, असे आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले असून चर योग्य पद्धतीने बुजवले नसल्यास निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र रस्त्यांवरील चर बुजवण्याचे काम कंत्राटदार करत असून कमी वेळेत एवढय़ा लांब रस्त्यांच्या कामांवर लक्ष देता येणे शक्य नसल्याचे साहाय्यक आयुक्तांचे म्हणणे आहे. चर बुजवण्याची जबाबदारी घेण्यास पालिकेत कोणीही तयार नसले तरी त्याचा त्रास मुंबईकरांना होणार आहे.

रस्त्यांमध्ये पाणी मुरणे हे रस्ते खराब होण्याचे एक कारण आहे. सेवा वाहिन्यांसाठी रस्ते खोदण्याची परवानगी देताना पालिका कोटय़वधी  रुपये शुल्क म्हणून गोळा करते. मात्र हे चर बुजवण्यासाठी फारशी खबरदारी घेतली जात नाही.

– अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ

गेल्या ८ महिन्यांत

३३

किमीचे चर पी उत्तर (गोरेगाव) व पी दक्षिण (मालाड) मध्ये

३०

किमीचे चर एम पूर्व विभागात