सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी नवी शक्कल

काळ्या पैशाविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’चा गवगवा सुरू असला तरी सरकार दरबारी कामे मार्गी लावण्यासाठी ‘वजन’ ठेवण्याची प्रथा अबाधित आहे. सध्या ‘तारण’ म्हणून आप्तांच्या नावे धनादेश द्या आणि नंतर नव्या नोटा आल्यावर पैसे द्या आणि धनादेश परत घ्या, असा मार्ग अधिकाऱ्यांनी शोधून काढल्याचे दिसत आहे.

५०० व हजारच्या नोटा बाद झाल्यामुळे निर्माण झालेल्या चलनसंकटावर काही सरकारी अधिकाऱ्यांनी धनादेशाचा हा पर्याय शोधून काढला आहे. नातेवाईकाच्या नावे धनादेश द्या, अशी मागणी काही सरकारी कार्यालयात होऊ लागल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयांतही काही अधिकाऱ्यांनी धनादेशाची मागणी केल्याचे कळते.

सरकारी कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय कुठलेही काम होत नाही, याचा अनुभव असलेल्या विकासकांनी आपल्या फाइली निकाली निघाव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली असता त्यांनी हा मार्ग सुचविला. इतकेच नव्हे तर धनादेश स्वीकारून काही फाइली निकालातही काढल्या गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही अधिकाऱ्यांनी हे धनादेश आम्ही बँकेत भरणार नाही. मात्र नव्या नोटा द्या आणि नंतर धनादेश घेऊन जा, असाही सल्ला दिल्याचे एका विकासकाने सांगितले.