सुरक्षा उपाय आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे खर्चाचा बोजा

मुंबई : चित्रीकरणास परवानगी मिळाल्यानंतर टीव्ही जाहिरातींच्या चित्रीकरणासदेखील काही प्रमाणात सुरुवात झाली असली तरी दिवसाला केवळ एकाच पाळीत (शिफ्ट) काम करता येत असल्याने उत्पादन खर्चात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच करोनामुळे करावे लागणारे सुरक्षा उपाय आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे खर्चाचा बोजा आणखी वाढला आहे.

टाळेबंदीत सर्वच व्यवहार ठप्प असल्याने नवीन उत्पादनांच्या टीव्ही जाहिरातींची निर्मितीदेखील बंद होती. शिथिलीकरणानंतर केवळ काही ठरावीक उत्पादनांच्या टीव्ही जाहिराती तयार करण्याचे काम हळूहळू सुरू झाले. मात्र चित्रीकरणाचे नवीन नियम, सुरक्षेचे उपाय यामुळे एकूण खर्चात वाढ होत असल्याचे जाहिराती निर्मात्यांनी सांगितले.

सर्वसाधारणपणे एका टीव्ही जाहिरातीचे चित्रीकरण एक ते दोन दिवसांतच पूर्ण होते. कधी कधी उत्पादकाच्या गरजेनुसार दोन-तीन जाहिराती एकाच वेळी चित्रित केल्या जातात. मात्र सध्या चित्रीकरणासाठी केवळ एकच पाळी उपलब्ध करून दिली जात आहे. ‘सकाळी सात ते दोन किंवा सकाळी नऊ ते सहा अशीच वेळ सध्या वापरता येते. त्यामुळे एकच पाळी निवडावी लागते. परिणामी जे काम टाळेबंदीपूर्व काळात एका संपूर्ण दिवसात पूर्ण व्हायचे त्याला आता दोन दिवस लागत असल्याचे,’ स्पॅरो फिल्म प्रोडक्शनचे सचिन वैद्य यांनी सांगितले.

दुसरीकडे स्थलांतरित कामगार वर्ग पूर्णपणे परतला नाही. उपलब्ध कामगारांमधून काम पूर्ण करावे लागत असून त्यांनी शिफ्टचे वेतन वाढवून मागायला सुरुवात केली आहे. दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने वाढीव वेतन द्यावे लागत असल्याचे काही निर्मात्यांनी सांगितले. त्याचबरोबर करोनामुळे सुरक्षा उपायांच्या बंधनामुळे दिवसाला तीसेक हजारांचा खर्च वाढल्याचे ते नमूद करतात. या सर्वामुळे एकूण उत्पादन खर्चात सुमारे २२ ते २८ टक्क्यांची वाढ झाल्याचे वैद्य यांनी सांगितले.

करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी करावयाच्या उपायांमध्ये काही संघटना निर्जंतुकीकरणाचा आग्रह धरत आहेत. मानवी शरीरावर निर्जंतुकीकरणाचे फवारे मारण्यास आरोग्य विभागाने पूर्वीच मनाई केली आहे. मात्र तरीदेखील काही संघटना याचा आग्रह धरत असल्याचे एका निर्मात्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

जाहिरातींसाठी मुंबईतील ५० टक्के कलाकार (शक्यतो आई-वडील कुटंबासहित एकत्र राहणारे) कामास येण्यास फारसे उत्सुक नसल्याने कलाकारांची कमतरतादेखील भासत आहे. एकटे राहणारे, इतर राज्यांतून येथे आलेले कलाकारच सध्या तयार असल्याचे निर्माते सांगतात. आणि ५५ वर्षांवरील व्यक्तीस परवानगी नसल्याने असे पात्र नसणारीच जाहिरात करावी लागत असल्याचे टीव्ही जाहिरात निर्मात्यांनी सांगितले.

टाळेबंदीच्या काळात घरच्या घरीच चित्रीकरण करून काही जाहिराती तयार करण्यात आल्या. मात्र त्यांची तांत्रिक गुणवत्ता टीव्हीसाठी पुरेशी नव्हती.

त्यामुळे अशा जाहिरातींचा वापर बहुतांशपणे डिजिटल माध्यमांवरच झाला होता. टीव्हीसाठीच्या जाहिरातींच्या चित्रीकरणास शिथिलीकरणानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.