स्त्री-भ्रूण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. सरस्वती व सुदाम मुंडे या दाम्पत्याला परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता जामीन नाकारण्याऐवजी त्यांची जामिनावर सुटका करणारे अंबाजोगाई (बीड) येथील जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. महाजन यांना शिस्तभंगाची कारवाई म्हणून उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने निलंबित केले आहे. त्याबाबतची नोटीस उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये महाजन यांच्या निलंबनाचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही.
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अत्यंत कमी आहे. त्यातच मुंडे दाम्पत्याने कर्तव्य बाजूला सारून सर्रासपणे स्त्रीभ्रूण हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर एकूण परिस्थितीचा विचार करता महाजन यांनी त्यांना जामीन नाकारणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी त्यांची जामीनावर सुटका केली. महाजन यांच्या या कृतीची उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने गंभीर दखल घेत त्यांना निलंबित केले, असे सूत्रांतर्फे सांगण्यात आले.