कोविड जैववैद्यकीय कचऱ्यावर कुठलीही शास्त्रीय प्रक्रिया न करता तो कल्याण येथील आधारवाडी क्षेपणभूमीवर टाकला जाणे हे गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. तसेच या प्रकरणी दाखल याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकार, कल्याण—डोंबिवली पालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

डोंबिवलीस्थित किशोर सोहोनी यांनी अ‍ॅड्. साधना कुमार यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. त्यात त्यांनी कोविड जैववैद्यकीय कचऱ्याची कुठल्याही शास्त्रीय प्रक्रियेशिवाय आधारवाडी क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठीच्या नियमांचे पालिकेकडून पालन केले जाते की नाही याची पाहणी करायची आहे. त्यामुळे याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवडय़ांचा वेळ देण्याची मागणी मंडळातर्फे करण्यात आली.