जे.जे. रुग्णालयात आता ‘कोव्हॅक्सिन’पाठोपाठ ‘कोविशिल्ड’ लसदेखील देणे सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही लशी आता रुग्णालयात उपलब्ध असतील.
मुंबईत जे.जे. रुग्णालय हे ‘कोव्हॅक्सिन’ लशीचे एकमेव केंद्र आहे. त्यात ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे याच्या परिणामकारकता आणि प्रभावीपणाबाबत साशंकता असल्याने सुरुवातीला प्रतिसाद कमी होता; परंतु आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाल्यापासून हळूहळू प्रतिसाद वाढला आहे.
जेजेमध्ये ‘कोव्हॅक्सिन’चे लसीकरण सुरू केले तेव्हा एकीकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ‘कोविशिल्ड’ आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ‘कोव्हॅक्सिन’ हा भेदभाव का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे जेजेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी लसदेखील घेतलेली नाही. कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाल्यानंतर जे कर्मचारी कोविशिल्ड लशीसाठी थांबलेले आहेत, ते लसीकरणासाठी येतील, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
लसीकरणाची क्षमता वाढविण्यासाठी आता ‘कोविशिल्ड’चे लसीकरणही जे.जे.मध्ये सुरू केले आहे. सोमवार ते गुरुवार ‘कोव्हॅक्सिन’ आणि शुक्रवारी आणि शनिवारी ‘कोविशिल्ड’ असे दोन्ही लशींचे नियोजन केले आहे.
– डॉ. ललित संख्ये, रुग्णालयातील सामाजिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2021 12:42 am