दृष्टिहिनांना संगणकाआधारित गेम खेळण्यात बऱ्याच अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन यशोवर्धन कोठारी, देव कपाशी आणि ध्रुव जव्हेरी या मुलांनी दृष्टिहिनांना सहज हाताळता येईल, असा गेम तयार केला आहे. ‘व्हिजन बियॉण्ड’ असे या गेमचे नाव आहे.

ध्रुवचा भाऊ  मोक्ष जव्हेरी हा दृष्टिहीन असल्याने त्याला गेम खेळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींसाठी तयार केलेल्या गेमचा त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. भारतात असे गेम फारसे उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मोक्ष आणि त्याच्यासारख्या इतर मुलांसाठी गेम तयार करायचा निर्णय घेतला.

दृष्टिहीन मुलांना सहज खेळता येईल, प्रत्येकाला परवडेल आणि रंजकही असेल असा गेम बनविण्याची योजना त्यांनी आखली. बरेच गेम खेळून पाहिले, दृष्टिहीन मुलांशी गप्पा मारल्या, त्यांच्या शाळेत जाऊन गेम खेळताना त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. दीड वर्ष ही मुले झपाटल्यासारखे संशोधन करीत होती. गेम बनवणे, त्याचे कोडिंग, डाटाबेस, ट्रायल अशी प्रक्रिया आणि ‘पायथॉन’ ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरून सामान्य अध्ययनावर आधारित ‘व्हिजन बियॉण्ड’ हा गेम आकाराला आला.

यशोवर्धन कोठारी याने सांगितले की, आम्ही तिघेही दृष्टिहिनांसाठी गेम बनवण्याच्या विचाराने प्रेरित होतो. काम सोपे नव्हते. आराखडा तयार करणे, कोडिंगची भाषा शिकणे, थ्रीडी मोडय़ुल तयार करणे, व्हाइस इम्पोर्ट हे सगळे आव्हानात्मक होते.

 प्रसारासाठी प्रयत्न

दृष्टिहिनांसाठी काम करणाऱ्या संस्थांना हा गेम दान करण्याचाही आम्ही विचार करत आहोत. हा गेम अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावा, त्यांना तो खेळून मजा यावी असे आम्हाला वाटते. त्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होऊन बाजारात उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यशोवर्धन, देव आणि ध्रुव यांनी सांगितले.

..गेममध्ये काय?

* ‘व्हिजन बियॉण्ड’ हा दृष्टिहिनांसाठी बनवलेला विशेष गेम आहे.

* एका वेळी चार जण, दोघे किंवा एकटाही हा गेम खेळू शकतो.

* प्रत्येक पुढची पातळी अधिक आव्हानात्मक बनत जाते. त्याचे पॉइण्ट्स मिळतात.

* आपल्याकडे अजूनही सगळ्याच अंध व्यक्तींना ब्रेल भाषा येत नाही, त्यामुळे ती भाषा न येणाऱ्यालाही हा गेम खेळता यावा म्हणून गेम संवादी करण्यात आला आहे.

* अधिक माहितीसाठी http://visionbeyond.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.