पाच वर्षांत गुन्ह्यंची संख्या ११ वरून २५७वर; कार्डचे ‘क्लोनिंग’ करून बनावट कार्डद्वारे लुबाडणूक
अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने क्रेडिट कार्डावरील माहिती चोरी करून त्याद्वारे लुटणाऱ्या ठकसेनांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. कार्ड स्वाइप करण्याच्या निमित्ताने त्याचे ‘क्लोन’ करून आणि त्याआधारे बनावट कार्ड तयार करून पैसे लंपास करणाऱ्या दोन टोळय़ांना मुंबई पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत जेरबंद केले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या अशा घटनांमध्ये वीस पट वाढ झाली असून यंदाच्या वर्षी आतापर्यंत २५७ गुन्हे उजेडात आले आहेत.
मालाड लिंक रोड येथील इनऑर्बटि मॉल येथे एका खासगी कंपनीच्या किऑस्कवर कार्डच्या साहाय्याने पसे चुकविलेल्या ग्राहकांच्या mum01खात्यातून एकाएकी पसे गेल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस निरीक्षक सुनील यादव यांच्या नेतृत्वाखाली ९ जुल रोजी या किऑस्कवर छापा मारला असता, मॅग्नेटिक स्क्रिप्ट रीडर मशीनच्या (एमसीआर मशीन) साहाय्याने दोन व्यक्ती कार्ड स्वाइप करून डेटा चोरी करत असल्याचे कळले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर अशा अनेक ग्राहकांच्या कार्डाचा डेटा चोरी केल्याची कबुली दिली. तर, २५ जुलला वांद्रय़ाच्या एका प्रसिद्ध शॉिपग मॉलमध्ये एक नायजेरियन व्यक्ती क्रेडिट कार्डचा चोरलेला डेटा विकण्यासाठी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली. या नायजेरियन व्यक्तीकडून ९२ बनावट कार्डे हस्तगत करत आणखी तीन जणांना पोलिसांनी अटक केले. क्रेडिट कार्डमधील डेटाची चोरी करण्याच्या घटना हॉटेल, छोटे स्टॉल येथून मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, बँकेकडून बोलत असल्याचे सांगून पिन क्रमांक मागूनही फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे.
गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर क्रेडिट कार्डाविषयीच्या गुन्ह्य़ांमध्ये २० पटींनी वाढ झाल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कबूल केले.
२०१० मधील संपूर्ण वर्षांत केवळ ११ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर २०१६च्या पहिल्या सात महिन्यांत २५७ गुन्हे नोंदविण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने अधोरेखित केले. शहरात कार्डाचा डेटा चोरून झालेल्या फसवणुकीशी संबंधित दिवसाला किमान १ गुन्हा नोंदविला जात असून नागरिकांनी आपली बहुमूल्य कमाई चोरटय़ांच्या हाती जाऊ नये यासाठी शक्य तितकी काळजी घ्यावी, असे आवाहनही मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काय काळजी घ्याल?
आपले क्रेडिट कार्ड, त्याचा क्रमांक, पिन क्रमांकाची माहिती मित्र, नातेवाईक यांना कधीही फोनवरून सांगू नका. गरज असल्यास लघुसंदेशाचा वापर करा.
कुठलीही बँक फोनवरून कार्डविषयी महत्त्वाची माहिती विचारत नाही, अशा प्रकारे कुणी विचारल्यास थेट बँकेशी संपर्क साधा.
कार्ड स्वाइप करताना वापरले जाणारे मशीन निरखून पाहा. त्याला अतिरिक्त मशीन किंवा रीडर बसवलेला नाही हे पाहा.
हॉटेलमध्ये कधीही कार्ड स्वाइप करण्यासाठी दुसऱ्याचा हाती देऊ नका, स्वत:हून जाऊन स्वाइप करा.