ठाणे महापालिकेच्या वागळे प्रभाग समिती कार्यालयातील पर्यवेक्षिकेच्या कार्यालयात घुसून होर्डीगच्या प्रश्वावरुन वाद घालत कार्यालय डोक्यावर घेणारे ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना वागळे पोलिसांनी गुरुवारी चांगलाच हिसका दाखविला. ‘आपल्याला हवी असलेली माहिती तातडीने द्या’, असा हट्ट धरत इंदुलकर यांनी प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातलीच शिवाय कामकाजही बंद पाडले. इंदुलकरांच्या हट्टामुळे या कार्यालयात इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले. अखेर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी वागळे पोलिसांनी इंदुलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.  
ठाणे येथील पाचपखाडी भागातील रहिवाशी असणाऱ्या सुविधा पवार या महापालिकेच्या वागळे प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन उप-अधिक्षक पदावर काम करतात.  मंगळवारी दुपारी पवार कार्यालयात काम करण्यात व्यस्त होत्या. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदिप इंदूलकर त्यांच्या केबीनमध्ये शिरले आणि त्यांनी विभागात लावण्यात आलेल्या बॅनर आणि होर्डिगविषयी माहिती विचारू लागले. काही वेळाने तर त्यांनी आरडाओरड करत कार्यालय डोक्यावर घेतले. यापुर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात अशाचप्रकारे वाद घातल्यामुळे इंदुलकर यांना मारहाण झाली होती.
इंदूलकरांची अरेरावी..
शहरात लावण्यात आलेल्या बॅनर तसेच होर्डिगविषयी माहिती प्रदिप इंदूलकर माहिती अधिकारातही माहिती मागू शकले असते. तसेच त्यांच्याकडे माहिती घेण्यासंबंधीचे अनेक पर्याय समोर होते.  याप्रकरणी इंदुलकर यांच्याशी संपर्क साधला असता पवार यांनी दोन दिवसांनी मी त्यांना भेटण्यास गेलो. पण, त्यांनी बॅनर, होर्डिगविषयी माहिती दिली नाही. तसेच सरकारी कामात अडथळा आणला नसल्याचे सांगितले.