नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात अन्य तरुणीसोबत जवळीक करणाऱ्या प्रियकराला जाब विचारल्याने जान्हवी कुकरेजा (वय १९ वर्षे) हिची हत्या करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचे खार पोलिसांनी शनिवारी न्यायालयाला कळवले.

जान्हवीच्या हत्येचा आरोप ठेवत खार पोलिसांनी शनिवारी श्री जोगधनकर (२२) आणि दिया पडळकर (१९) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सांताक्रुझ परिसरात एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या जान्हवी आणि दिया जीवलग मैत्रीणी होत्या. तर श्री आणि जान्हवी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गुरुवारी रात्री श्री आणि दिया यांच्यातील जवळीक जान्हवीला खटकली. त्यातच या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यावर ती अस्वस्थ झाली आणि तिचा संयम सुटला, अशी माहिती कार्यक्रमास उपस्थित असलेल्या तरुणांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

‘भगवती हाइट्स’ इमारतीत राहणाऱ्या यश आहुजाने नववर्ष स्वागतानिमित्त निवडक मित्रांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याला जान्हवी, दिया, श्री याच्यासह १५ तरुण उपस्थित होते. जान्हवी संध्याकाळी सातच्या सुमारास ‘भगवती हाइट्स’इमारतीत पोहोचली. वडिलांचा वाढदिवस असल्याने ती अकराच्या सुमारास सांताक्रुझ येथील घरी परतली. तेव्हा तिच्या घरी दिया आणि श्री हेही उपस्थित होते. या दोघांसोबत तिने वडिलांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तिघे रात्री बारापूर्वी पुन्हा ‘भगवती हाइट्स’च्या गच्चीत पोहोचले. हे तिघे अन्य मित्र-मैत्रिणींपासून दूर मद्यपान करत कार्यक्रमाचा आनंद घेत होते.

कार्यक्रमाला उपस्थित पाच तरुणांकडे पोलिसांनी विचारपूस के ली तेव्हा मध्यरात्री एकच्या सुमारास अतिमद्यपानामुळे दियाला उलटय़ा होऊ लागल्या. त्यामुळे जान्हवीने अन्य मित्रांच्या मदतीने दियाला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील यश आहुजा याच्या घरी नेले. त्यानंतर ही सर्व मंडळी पुन्हा गच्चीत आली.

काही वेळाने यश याच्या घरी दिया आणि श्री यांना जान्हवीने नको त्या अवस्थेत पाहिले. तिने हा प्रसंग अन्य एका मैत्रिणीला फोन करून कळवला. श्री याला गमावण्याची भीती तिने या मैत्रिणीकडे व्यक्त केली. ती बराच वेळ मोबाइलवर बोलत गच्चीत येरझारा घालत होती. कार्यक्रमाला उपस्थितांपैकी काहींनी इमारतीच्या जिन्यावर जान्हवीला रडतानाही पाहिले, अशी माहिती समोर आली आहे.

कार्यक्रमास उपस्थितांचे सविस्तर जबाब नोंदवण्यात येत आहेत. तसेच गुरुवारी संध्याकाळी सात ते मध्यरात्री दोन या वेळेतील घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. दरम्यान, या तिघांचे मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोबाइल तपासणीआधारे श्री, दिया आणि जान्हवीत नेमके काय घडले, हे जाणून घेण्यात येत आहे.

दोघांची स्वतंत्र चौकशी

आरोपी श्री आणि दिया यांनी गुरुवारी मध्यरात्री ‘भगवती हाइट्स’च्या अंधाऱ्या जिन्यावर काय घडले, वाद कशावरून झाला याबाबत काहीच आठवत नसल्याचा दावा केला. त्यामुळे दोघांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

अमानुष मारहाण

– शुक्रवारी पहाटे ‘भगवती हाइट्स’ इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याजवळ जान्हवीचा मृतदेह पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आढळला. प्राथमिक पाहणी आणि कूपर रुग्णालयात पार पडलेल्या शवचिकित्सेतून जान्हवीच्या कवटीचा अस्थिभंग (ला फ्रॅक्चर) झाल्याचे निदर्शनास आले. कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस खोलवर जखमा आढळल्या. तसेच डोके , चेहरा, हात, गुडघे, निगडी, खुबा येथेही जखमा आणि खरचटल्याचे व्रण आढळले.

– इमातरीच्या दुसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या लोखंडी गजांवर, भिंतींवर रक्ताचे डागही पोलिसांना आढळले. तसेच दुसऱ्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत केसही सापडले. न्यायवैद्यक पथकाने हे सर्व नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले आहेत. दुसरीकडे दिया आणि श्री हेही जखमी आहेत. श्री याच्या डोक्यावर जखम असून हात, दंड, पाठीवर ओरबाडल्याचे व्रण आहेत.

– जखमा आणि घटनास्थळावर आढळलेल्या खाणाखुणांवरून श्री, दिया आणि जान्हवी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले असावे. श्री आणि दिया यांनी केस पकडत भिंतीवर, जिन्याच्या लोखंडी गजांवर जान्हवीला आपटले, हाताने मारहाण केली, जिन्यावरून फरफटत खाली आणले असावे. जान्हवीनेही दोघांचा बराच वेळ प्रतिकार केला असावा. त्यात दोघेही जखमी झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

लैंगिक अत्याचार?

प्राथमिक पाहाणीत जान्हवीच्या मृतदेहावरील कपडे अस्ताव्यस्त होते. ही स्थीती श्री, दिया यांच्यासोबत घडलेल्या झटापटीमुळे घडली की जान्हवीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला गेला, याबाबत पोलीस तपास करत आहेत. तपासाशी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याने या माहितीस दुजोरा दिला.

आमंत्रण नाही..

भगवती हाईट्स इमारतीत आयोजित कार्यक्रमाचे आमंत्रण आरोपी श्री याला नव्हते. जान्हवी, दिया यांच्यासोबत तो या कार्यक्रमात सहभागी झाला. तसेच जान्हवीचा प्रियकर म्हणून त्याची ओळख कार्यक्रमात सहभागी झालेल्यांशी करून देण्यात आली.