राजकीय हितापेक्षा विद्यापीठांनी ठरवून दिलेले २२ निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांनाच महाविद्यालये स्थापन करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या निकषात बसू शकतील अशा ५० महाविद्यालयांनाच यंदा मान्यता मिळणार आहे.
नवीन महाविद्यालयांच्या परवानगीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी रात्री बैठक पार पडली.  उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी आलेल्या हजारो अर्जामध्ये २५० प्रस्ताव पात्र ठरले होते. यापूर्वी राजकीय नेत्यांना खूश करण्यासाठी निकष किंवा अटींकडे दुर्लक्ष करून महाविद्यालयांना मान्यता दिली जात असे. तसेच मान्यता देताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी ५० टक्के विभागणी केली असे. यंदा मात्र राजकीय हितापेक्षा निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता देण्यावर भर देण्यात आला.
विद्यापीठाचे सारे निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात येणार आहे. या निकषात ५० महाविद्यालयांचा समावेश होतो, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या महाविद्यालयांची यादी १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.