करार संपल्यानंतरही बॉम्बे जिमखान्याकडून पदपथाचा वापर

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत  दहा ठिकाणांमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसराला आघाडीचे स्थान मिळावे म्हणून तेथील फेरीवाल्यांची महात्मा गांधी मार्गावर पाठवणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र महात्मा गांधी रोडवरील बॉम्बे जिमखान्याने सभासदांच्या वाहनतळासाठी अडवलेला पदपथ कराराची मुदत संपूनही आपल्याच ताब्यात ठेवला आहे. त्यामुळे सीएसटीवरील फेरीवाल्यांचे स्थलांतर रखडलेले आहे.

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत धार्मिक स्थळे व पुरातन वास्तू अशा दहा ठिकाणांची यादी तयार करण्यात आली असून ही ठिकाणे स्वच्छ, सुंदर करण्यासाठी त्या त्या ठिकाणची प्राशासने कामाला लागली आहेत. या यादीमध्ये मुंबईमधील सीएसटीचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने परिसरातील फेरीवाल्यांना महात्मा गांधी रोडवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. हज हाऊसपासून थेट सेंट जॉर्ज रुग्णालयापर्यंतचा पदपथ फेरावालामुक्त करण्यात येणार आहे. पदपथांची दुरुस्ती करून ते चकाचक करण्यात येणार असून भविष्यात पदपथ पूर्णपणे पादचाऱ्यांसाठीच मोकळे होणार आहेत.

महात्मा गांधी रोडवर एका बाजूला फॅशन स्ट्रीट उभे राहिले आहे. त्याच्या समोरच्या पदपथावर पालिकेच्या विविध विभागांच्या चौक्या आणि पुढे बॉम्बे जिमखान्याने आपल्या सभासदांसाठी पालिकेच्या परवानगीने पदपथाचा वाहनतळ म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पालिकेबरोबर झालेला करार संपुष्टात आला आहे. या पदपथाचा वापर आजही वाहनतळासाठीच केला जाता आहे. या पदपथावर परिसरातील फेरीवाल्यांना स्थलांतरित करणार आहे. पदपथावरील वाहनतळाच्या कराराचे नूतनीकरण करावे अशी मागणी बॉम्बे जिमखान्याने पालिकेकडे केली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पालिकेला वर्षभराच्या कालावधीत सीएसटी परिसर चकाचक करावयाचे आहे. मात्र बॉम्बे जिमखान्याबाहेरील पदपथावरील वाहनतळाबाबत जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांचे स्थलांतर पालिकेला करता येणार नाही. फेरीवाल्यांचे स्थलांतर होत नाही, तोपर्यंत सीएसटी परिसर स्वच्छ, सुंदर करता येत नाही, असे त्रांगडे होऊन बसले आहे.

मुंबईचे  स्थान घसरणार?

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये घसरलेले मुंबईचे स्थान आघाडीवर यावे यासाठी पालिकेने स्वच्छतेवर भर देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र पालिकेचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. आता वर्षभराच्या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस चकाचक होऊ शकले नाही, तर ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये मुंबईचे स्थान खाली घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.