छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वेच्या विश्रामगृहात झालेल्या नाझिया या महिलेच्या मृत्यूनंतर रेल्वे पोलिसांनी हे विश्रामगृह तपास पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मडगाव एक्स्प्रेसने शुक्रवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे उतरलेल्या नाझिया यांचा विश्रामगृहात मृत्यू झाला होता. विश्रामगृहातील सर्वच खोल्यांमध्ये किटकनाशकाची फवारणी करण्यात आलेली होती. पोलिसांनी नाझिया यांच्या मृतदेहाचा व्हिसेरा व अन्य पुरावे कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. याच विश्रामगृहात गुरुवारी उतरलेल्या एका प्रवाशालाही अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत या विश्रामगृहात कोणाही प्रवाशांना जागा देऊ नये आणि ते बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.