सांस्कृतिक कार्यक्रमांमधून होणारी वैचारिक देवाण-घेवाण ठप्प

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : आर्थिक उलाढाल असलेले उद्योगधंदे हळूहळू रुळावर येत असले तरीही सांस्कृतिक उलाढाल अजूनही ठप्पच आहे. राज्यातील सर्व सांस्कृतिक संस्था सध्या बंद असल्याने त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. प्रत्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रमांमधून होणारी वैचारिक देवाण-घेवाण पुन्हा सुरू व्हावी यासाठीही संस्थाचालक आणि रसिकवर्ग आतुर झाला आहे.

मुंबई मराठी साहित्य संघ

‘मुंबई मराठी साहित्य संघा’साठी त्यांचे नाटय़गृह हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. सध्या नाटय़गृह बंद असल्याने संस्थेचे उत्पन्न तर थांबले आहेच, पण नाटय़गृहाशी संबंधित रंगमंच कामगार, फलक लिहिणारे, सफाई कामगार यांच्या हाताला काही काम उरलेले नाही.  जानेवारीत साहित्य संघाच्या नाटय़गृहात ‘राज्य नाटय़ स्पर्धा’ पार पडली. त्यासाठीचे लाखो रुपये भाडे येणे बाकी आहे. मराठी भाषेचे वर्ग आणि नाटय़ प्रशिक्षण वर्गही बंद आहेत.

साहित्य संघ

साहित्य संघ ही सार्वजनिक संस्था आहे. संस्था जगवायची असेल तर लोक आले पाहिजेत, असे साहित्य संघाच्या नाटय़ शाखेचे कार्यवाह प्रमोद पवार म्हणाले. नाटय़गृह किमान चित्रीकरणाकरता उघडण्याची परवानगी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. सरकारकडून दरवर्षी मिळणारे १० लाख रुपये अनुदानही अद्याप मिळाले नसल्याची माहिती संस्थेच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांनी दिली.

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र

‘दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रा’त सांगीतिक कार्यक्रम होतात. नाटकांच्या तालमींसाठी आणि लग्नासाठी सभागृह भाडय़ाने दिले जाते. टाळेबंदीमुळे सर्व कार्यक्रम बंद करावे लागले. शिवाय गेले काही महिने संस्थेची इमारत विलगीकरणासाठी पालिके च्या ताब्यात होती. इमारत पुन्हा संस्थेच्या ताब्यात आल्यानंतर काही प्रमाणात ऑनलाइन कार्यक्रम सुरू के ल्याची माहिती विद्या धामणकर यांनी दिली.

लोकमान्य सेवा संघ

या संस्थेतर्फे लोकजागृतीपर कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार, व्याख्याने होतात. पण सध्या सर्व उपक्रम बंद असल्याने देणग्या मिळत नसल्याचे संस्थेचे कार्यवाह महेश काळे यांनी सांगितले. सभागृहात लग्न समारंभ नसल्याने तेथील भाडे बंद आहे. व्यक्तीच्या सर्वागीण विकासासाठी ‘अमर हिंद मंडळा’तर्फे  रक्तदान शिबिरे, खेळांची प्रशिक्षणे, नाटय़शिबिरे, एकांकिका स्पर्धा, नाटय़लेखन स्पर्धा, वक्तृ त्व स्पर्धा घेतल्या जातात. मात्र, आता टाळेबंदीनंतरच हे चक्र पूर्ववत होऊ शकते. संस्थेतर्फे  काही गरजू संस्थांना देणग्या दिल्या जातात. त्या सध्या बंद आहेत. ऑनलाइन व्याख्याने सुरू आहेत. पण प्रत्यक्ष व्याख्यानांच्या वेळी वक्त्यांना भेटता येते, वैचारिक देवाण-घेवाण होते, यावर मर्यादा येत असल्याचे संस्थेचे कार्यवाह दीपक पडते सांगतात.

महाराष्ट्र सेवा संघ

या संस्थेतर्फे   संस्कृत नाटक, महिलांसाठी प्रबोधनात्मक आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम के ले जातात. हे सर्व उपक्रम सध्या बंद आहेत. मात्र तरीही संस्कृत नाटक  लेखन स्पर्धा, व्याख्याने, वाचक संवाद हे कार्यक्रम ऑनलाइन होत असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह जयप्रकाश बर्वे यांनी दिली. संस्थेच्या सभागृहात सध्या लग्न समारंभ होत नसल्याने लाखोंचे भाडे बुडत आहे. ‘अपना बाजार’चे १ लाख रुपये भाडे सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन काही प्रमाणात देता येत आहे.