प्रायोगिक तत्त्वावर विलेपार्ले पूर्व भाग आणि शिवाजी पार्क येथे सेवा

वाढत्या वयानुसार वयोवृद्धांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्याबाबतच्या शंकांचे निरसन करणे आणि त्यांच्याशी संवाद साधून मानसिक आधार देणे यासाठी आता शहरामध्ये लवकरच खास ज्येष्ठ नागरिकांसाठी सायकल रुग्णसेवा सुरू होणार आहे. मोटार सायकल रुग्णवाहिकेच्या संकल्पनेच्या धर्तीवर सुरू करण्यात येणारी सेवा प्रायोगिक तत्त्वावर विलेपार्ले पूर्व भाग आणि शिवाजी पार्क येथे राबविण्यात येईल.

मुंबईमध्ये गर्दीच्या वेळेमध्ये रस्त्यांवरील वाहनांच्या रहदारीमधून वाट काढत रुग्णवाहिकांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे कठीण होते. तेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा मिळून रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी वर्षभरापूर्वी दहा मोटार सायकल शहरामध्ये सुरू केल्या गेल्या. या रुग्णवाहिकानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सायकल रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा पहिला टप्पा विलेपार्ले पूर्व भाग आणि शिवाजी पार्क येथे सुरू  होणार आहे.निम्नवैद्यकीय सेवा या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहेत. निम्नवैद्यकीय प्रशिक्षित व्यक्ती सायकलचालक म्हणून कार्यरत असेल.

दोन भागांसाठी २५ सायकली

प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा पहिला टप्पा विलेपार्ले पूर्व भाग आणि शिवाजी पार्क येथे सुरू  होणार आहे. दोन्ही भागांसाठी एकूण २५ सायकल रुग्णवाहिका सध्या कार्यरत होणार असून निम्नवैद्यकीय सेवा या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहेत. निम्नवैद्यकीय प्रशिक्षित व्यक्ती सायकल चालक म्हणून कार्यरत असेल. यामध्ये आरोग्याबाबतच्या शंकांचे निरसन करणे, मधुमेह, रक्तदाब आदी प्राथमिक तपासण्या करणे या सोबतच त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून मानसिक आधार देणे या सुविधा देण्यात येतील.

१०८ या रुग्णवाहिकेप्रमाणेच दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर ही सायकल रुग्णसेवा वृद्धांपर्यत पोहचेल. यासाठी मुंबईतच एक कार्यालय स्थापित करण्यात येणार असून त्या माध्यमातून ही सेवा कार्यान्वित करण्यात येईल. याबाबतची तांत्रिकदृष्टय़ा कार्यवाही सुरू झाली असून प्रकल्प लवकरच पूर्ण होईल,

-दीपक सावंत, आरोग्यमंत्री