|| संदीप आचार्य

देशभरात शहरी भागात राहणाऱ्या जवळपास ७० टक्के नागरिकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून आली असून त्यामुळे हाडांचा ठिसूळपण, केसांचे गळणे, मधुमेह, रक्तदाब, शारीरिक शक्ती कमी होण्यापासून निराशा व चिडचिड होत असल्याचे ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालात नमूद केले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात ८० टक्के लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून आली आहे.

केंद्र सरकारच्या ‘चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ने ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत दिल्लीमध्ये एक पाहणी केली होती. या पाहणीत जवळपास ८० टक्के दिल्लीकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे आढळून आले. त्यातही प्रामुख्याने २१ ते ३५ वयोगटातील लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे दिसून आले. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार शहरी भागात राहणाऱ्या एकूणच ७० टक्के भारतीयांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येते, तर ग्रामीण भागात हे प्रमाण ५० टक्के एवढे आहे. शहरी भागातील लहान मुले, नोकरदार तसेच वृद्धमंडळी पुरेशा सूर्यप्रकाशात वावरत नसल्यामुळे शरीरासाठी महत्त्वाचे असलेले ‘ड’ जीवनसत्त्व त्यांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही. यातूनच ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. केईएमचे अधिष्ठाता व पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी याबाबत सांगितले की, सकाळची सूर्याची कोवळी किरणे किमान वीस मिनिटे अंगावर पडणे आवश्यक आहे.

या किरणांमधून ‘ड’ जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळत असते. तथापि, मुंबईसारख्या शहरात बदलत्या जीवनशैलीचा विचार करता एवढा वेळ सूर्यप्रकाशात राहायला कोणाकडे वेळ नसतो. त्यातच मोठय़ा इमारतींमुळे आणि ऑफिसमधील बैठय़ा कामांमुळे सूर्यप्रकाशापासून बहुतेक लोक वंचित राहतात. अशा जवळपास सर्वच लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येईल. शरीरात ‘डी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण आवश्यकतेपक्षा कमी असल्यास हाडांचा ठिसूळपणा, मणक्याचा त्रास होऊ लागतो. लवकर थकवा येणे तसेच शक्ती कमी होणे, त्याचप्रमाणे नैराश्य निर्माण होताना दिसते. क्षयरोगात एक संशोधन झाले होते.  क्षयरुग्णाला ‘ड’ जीवनसत्त्व दिल्यास तो लवकर बरा होतो असेही आढळून आले. पालिका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या लहान मुलांना  ‘ड’ जीवनसत्त्व देण्याला प्राधान्य देतो, असेही  सुपे यांनी सांगितले.

विख्यात ऐंडोक्रोनॉलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय मानकानुसार रक्तात ‘ड’ जीवनसत्त्व ३० नॅनोग्रॅम प्रति मिलीलिटर यापेक्षा कमी असल्यास तीव्र कमतरता असल्याचे मानले जाते. तथापि, या मताशी मी सहमत नसून भारताचा विचार करता हे प्रमाण दहापेक्षा कमी असल्यास तीव्र कमतरता मानावी, असा शोधनिबंध आम्ही ‘जापी’ या मासिकात प्रसिद्ध केला आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी मधुमेह व रक्तदाबाचा तसेच हृदयविकाराचाही त्रास उद्भवू शकतो, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले. औषध घेऊन जीवनसत्त्वाचा अभाव भरून काढता येतो, असेही डॉ. जोशी म्हणाले.

भारतातील ३६ टक्के बालकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण हे १० पेक्षा कमी असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले.  बाळाच्या आईमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असते. तसेच आईच्या दुधातूनही हे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात जात नसल्यामुळे  बाळाला ४०० इंटरनॅशनल युनिट प्रतिदिन एवढा ‘ड’ जीवनसत्त्वाचा डोस आम्ही देत असतो, असे ते म्हणाले.