एपीएमसी संपामुळे दादरच्या भाजी मंडईत शुकशुकाट, भायखळय़ात मात्र जोमात विक्री

नेहमीची गजबज नाही की जागा अडवण्यासाठी चाललेली तणातणी नाही..गिऱ्हाईक-विक्रेत्यांतील घासाघीस नाही की जोरात घातली जाणारी हाळी नाही.. एरवी वर्षांचे ३६५ दिवस अगदी पहाटेपासून गजबजणाऱ्या दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईला गेल्या चार दिवसांपासून अक्षरश: अवकळा आली आहे. केवळ मध्य मुंबईच नव्हे तर उपनगरांतील ग्राहकांसाठीही स्वस्त भाजी मिळण्याचे केंद्र असलेल्या दादरच्या भाजी मंडईला ‘एपीएमसी’च्या संपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दररोज मुंगीलाही शिरण्यास धक्काबुक्की करायला लागेल इतकी गर्दी असलेल्या या मंडईत बुधवारी मात्र शुकशुकाट होता.

एकीकडे दादरमध्ये हे दृश्य दिसत असताना भायखळय़ाच्या भाजी मंडईत मात्र उलटे चित्र पाहायला मिळत आहे.   थेट शेतकऱ्यांकडून विक्रीकरिता आलेल्या भाजीमुळे येथे भाजी तुलनेत स्वस्तात विकली जात होती. त्यामुळे येथील विक्रेते सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना दिसत होते.

रोजच्या कामाच्या व्यापामुळे क्षणाचीही उसंत नसलेले दादरच्या मंडईतील किरकोळ विक्रेते भाजीच नसल्याने विकायचे काय, अशा या चिंतेत दुकानात बसून होते. नियंत्रणमुक्तीमुळे आता शेतकऱ्यांकडून दलाली घेण्याऐवजी आता घाऊक व्यापारी थेट किरकोळ विक्रेत्यांकडे दलाली मागत आहेत. ही दलाली परवडणारी नसल्याने दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील किरकोळ भाजी विक्रेत्यांनीही गुरुवारी संप पुकारला होता. तशी नोटीसही मंडईच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली होती. मात्र सरकारने या प्रश्नावर समिती नेमून तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याने हा संप रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे एपीएमसीचा संपही मिटल्याने आता गुरुवारपासून येथील व्यवहार पूर्वीसारखे सुरू होणार आहेत.

किरकोळ व्यापारी हे पूर्णत: रोख किंमत देऊन माल खरेदी करीत नाहीत. शेतक ऱ्यांचा माल विकत घेताना हा माल रोख किंमत मोजून विकत घ्यावा लागतो. त्यामुळे शेतक ऱ्यांचा माल विकत घेण्याइतके  पैसे किरकोळ विक्रेते देऊ शकत नाही, अशा शब्दांत क्रांतिसिंह नाना पाटील मंडई विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सुनील मांढरे यांनी नव्या निर्णयाच्या अमलबजावणीतील अडचण सांगितली.

मंडईतील व्यापाऱ्यांनी काही प्रमाणात माल सकाळी मंडईत भाजी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांकडून विकत घेतला. परंतु, मंडईत दररोज लागणाऱ्या भाजी आणि फळांच्या मालाच्या तुलनेत फारच कमी असल्याने तो दुपापर्यंतच विकून संपला. त्यामुळे भाजी मंडई ओस पडल्याचे दृश्य होते. यामुळे घाऊकच नव्हे तर किरकोळ विक्रेतेही पिचले जात असल्याने त्यावर सरकारने तोडगा काढावा, अशी मागणी व्यापारी संघटना करीत आहेत, असे मांढरे यांनी सांगितले.

दुसरीकडे आनंदीआनंद

दादरच्या बाजारात बुधवारी उदास चित्र दिसत असताना भायखळय़ाच्या बाजारात मात्र चैतन्य संचारले होते. येथे थेट मंचरमधील शेतकऱ्यांकडून काकडी, बीट, फ्लॉवर मागविण्यात आले होते. दादरच्या तुलनेत ही मंडई लहान असल्याने भाजीची तोशीस इथे नव्हती.  भाजी स्वस्त मिळत असल्याने ग्राहकही खूश आहेत, असे स्थानिक विक्रेते सावकार मुंडे यांनी सांगितले.