दहीहंडी उत्सवादरम्यान रंगणारी उंच मानवी मनोऱ्याची स्पर्धा व त्यामुळे होणारे अपघात, गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाबद्दल वाढत असलेला निरुत्साह आणि नोकरी-शिक्षण यांचा वाढता ताण अशा विविध कारणांमुळे तरुणवर्गाने दहीहंडी उत्सवाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. ताज्या दमाचे तरुण उपलब्ध होत नसल्याने उंचच उंच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडणारी बहुतांश गोविंदा पथके अडचणीत आहेत. शहरातील नावाजलेली, प्रतिथयश पथकेही त्यातून निसटू शकलेली नाहीत. लोकसत्ताला मिळालेल्या माहितीनुसार सुमारे दोनशे पथकांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवातून माघार घेतली आहे.

गुरुपौर्णिमेपासून गोविंदा पथकांचा सराव सुरू होतो. तो जन्माष्टमीपर्यंत सुरू राहतो. सोमवार ते शुक्रवार उपस्थितांसोबतच्या या सरावाला शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवसांत धार येते. प्रत्येक पथकाकडे प्रशिक्षक असतो. प्रशिक्षक तळाच्या थरापासून अखेरच्या थरात कोण असेल याचे नियोजन करतो. शरीरयष्टीनुसार थरांतील गोविंदांची निवड केली जाते आणि त्यानुसार गोपाळकाल्यापर्यंत सराव करण्यात येतो. मात्र, यंदा या सरावासाठी गोविंदाच उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी तालिमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

‘प्रत्येक वर्षी शिक्षण, नोकरी, आजारपण, विस्थापनामुळे पथकाला गळती लागतेच. उपलब्ध गोविंदांचे वय-वजन वाढल्याने थरांची रचना बदलावी लागते. त्यांच्या ऐवजी ताज्या दमाचे गोविंदा सहभागी करून घ्यावे लागतात. याची तयारी दोन ते तीन वर्षे पूर्वीपासून करावी लागते. मात्र ताज्या दमाच्या नव्या गोविंदांची चणचण शहरातल्या सर्वच पथकांना आहे. मुंबईतून शेजारील शहरांमध्ये स्थायिक झालेल्यांची, पुनर्विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांची संख्या मोठी आहे. नोकरी-व्यापाराच्या व्यापामुळेही गळती, अनुपलब्धता कायम राहते,’ असे माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक अरुण पाटील यांनी सांगितले. ताडवाडीच्या श्री दत्त गोविंदा पथकाचे सचिव विवेक राणे यांनीही गोविंदांच्या चणचणीला दुजोरा दिला. ‘मुंबईतून इतरत्र स्थायिक झालेले काही वर्षे नियमितपणे सरावाला येतात. पण हळूहळू काम-धंदा, कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांचा सहभाग कमी होत जातो. यापैकी अनेक जिथे राहतात तिथल्याच गोविंदा पथकात सहभागी होतात किंवा गोविंदा पथक तयार करतात. त्यामुळे दक्षिण मुंबईतील अनेक गोविंदा पथके मावळतीला लागली आहेत.