मुंबईतील दहिसर येथे घरात मांसाहार शिजवल्याप्रकरणी आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करणारे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चव्हाण यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी या सगळ्याप्रकरणात कालपासूनचा राजकीय पक्षांचा वाढता सहभाग पाहता हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड शनिवारी संध्याकाळी चव्हाण कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले असताना त्यांनाही पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येणाऱ्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासूनच याठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, केवळ गुजराती लोकांच्या रक्षणासाठी पोलीसांना इतका मोठा बंदोबस्त तैनात करण्याची काय गरज होती, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. याप्रश्नी आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रसिध्द नाटय निर्माते गोविंद चव्हाण यांच्या घरात मांसाहारी अन्न शिजले म्हणून इमारतीतील रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबियांना गुरूवारी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.गोविंद चव्हाण दहीसरमधल्या ज्या बोना व्हेन्चर इमारतीत रहातात त्यात बहुसंख्या जैन-गुजराती समाजाचे प्राबल्य आहे. या इमारतीतील रहिवाशी चव्हाण कुटुंबियांना धमकावत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.रहिवाशी चव्हाण यांच्या दरवाजावर लाथा-बुक्क्यांचा प्रहार करुन असभ्य भाषेत त्यांना धमकावत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, हा सगळा वाद वैयक्तिक स्वरूपाचा असून चव्हाण यांच्याकडून अकारण मराठी-गुजराती वादाचे कारण पुढे केले जात असल्याचा दावा येथील रहिवाशांनी केला आहे.