मुंबईतील १०४ इमारती मे महिन्यापूर्वी मोकळय़ा करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

महापालिकेने वारंवार नोटीस बजावूनही रहिवाशी वास्तव्य करत असल्याची गंभीर दखल घेत अतिधोकादायक अवस्थेत असलेल्या मुंबईमधील १०४ इमारती वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन मेपूर्वी रिकाम्या करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी दिले. वीज आणि पाणीपुरवठा खंडित केल्यानंतरही अनधिकृत जोडण्या घेऊन राहणाऱ्या १४४ इमारतींतील रहिवाशांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळीय उपायुक्तांची मासिक आढावा बैठक बुधवारी पालिका आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींबाबतच्या कारवाईची माहिती उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलने) निधी चौधरी यांनी मांडली.

इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असतानाही रहिवाशी १०४ इमारतींमध्ये वास्तव्य करीत असून रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नाची गंभीर दखल घेत अजोय मेहता यांनी या १०४ इमारती मेपूर्वी रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे पोस्टर आणि माहितीपटाच्या माध्यमातून प्रबोधन करावे. प्रत्येक इमारतीमध्ये या संदर्भात करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची तपशीलवार नोंद करावी. प्रबोधनानंतरही स्थलांतरास रहिवाशी तयार नसल्यास इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करावा. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन या इमारती रिकाम्या कराव्या, असे स्पष्ट आदेश अजोय मेहता यांनी या बैठकीत दिले.

पालिकेने नोटीस बजावल्यानंतरही १४४ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशी स्थलांतरास तयार नाहीत. त्यामुळे अखेर पालिकेने या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला आहे. परंतु अनेक रहिवाशी आजही याच इमारतींमध्ये ठिय्या देऊन बसले आहेत. या इमारतींची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिले. पाहणी दरम्यान वीज आणि जलजोडणी अनधिकृतपणे घेण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित रहिवाशांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल करावा, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.

संरचना तपासणीच्या सूचना

मुंबईमधील ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्याचे बंधन यापूर्वीच घालण्यात आले आहेत. अशा संरचनात्मक तपासणी करावयाच्या इमारतींची यादी तयार करण्याचे आणि त्यांच्यावर नोटीस बजावण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांना केली.

६६४ इमारती अतिधोकादायक

इमारती रिकाम्या करण्याच्या पालिकेने केलेल्या पाहणीदरम्यान मुंबईमध्ये ६६४ अतिधोकादायक इमारती असल्याचे आढळून आले होते. त्यापैकी ९९ इमारती पूर्णपणे तोडून टाकण्यात आल्या आहे. उर्वरित ५६५ पैकी १०१ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत, तर १८० इमारतींना न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती मिळाली आहे. तसेच ३६ इमारतींबाबत तांत्रिक सल्लागार समितीच्या स्तरावर कारवाई करण्यात येत आहे. उर्वरित २४८ इमारतींपैकी १४४ इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून शिल्लक १०४ इमारतींमध्ये कोणतीच कारवाई झालेली नाही.