पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्राधान्याने करणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त आसीमकुमार गुप्ता यांनी गुरूवारी दिली.
मुंब्य्रासारख्या घटना का घडतात आणि अशा इमारतींमध्ये नागरिक का राहतात, या मागची सर्व कारणे शोधली पाहिजेत, तसेच अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी सविस्तर अभ्यास करून त्यावर उपाय योजले पाहिजेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गुप्ता यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  
स्थानिक संस्था कर ही पद्धत अतिशय चांगली आहे. मात्र, त्याबाबत काही शंका असल्याने व्यापाऱ्यांचा त्यास विरोध होत आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शंका दूर करू असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्वाची असल्याने त्यामुळे ती सुधारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरामधील नवे प्रकल्प सर्वाना विश्वासात घेऊन राबवू, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहराबद्दल ऐकले आहे आणि बाहेरूनच पाहिले आहे, त्याचे अंतरंग कसे आहे, याबाबत मला अजून पुरेशी माहिती नाही. त्यामुळे या संबंधीचा सविस्तर अभ्यास करून शहरात नेमके काय काम करायचे, याबाबत ठरविणार आहे. तसेच भविष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हांचा सामना करण्यासाठी तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कारणांचा शोध घेणार
गरिबी, परवडणारी घरे उपलब्ध नाहीत, अशा कारणांपायी धोकादायक तसेच अनधिकृत इमारतींमध्ये रहिवाशी राहतात. त्यामुळे अशी सर्व कारणे शोधली पाहिजेत आणि त्यावर उपाय योजले पाहिजेत. ही सर्वाची जबाबदारी असून त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आवाहन ठाण्याचे नवे महापालिका आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी केले.