कोणतेही र्निबध नसल्याने सुरक्षा अंधारात
शहरातील आग लागण्याच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल अनेक उपाययोजना तपासून बघत असतानाच दिवाळीत तरुण मंडळी आकाशात प्रकाशझोत सोडणाऱ्या धोकादायक दिव्यांची ऑनलाइन खरेदी करत आहेत. यात या दिव्यांच्या खरेदीवर अनेक संकेतस्थळांवर ३० ते ४० टक्क्यांची सवलती दिली जात असल्याने या दिव्यांच्या खरेदीचा जोर वाढला आहे. मात्र या दिव्यांमुळे शहरात कदाचित एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते, याची या तरुणाईला जाणीव नसल्याचेच चित्र दिसत आहे. यामुळेच हे दिवे आकाशात सोडू नयेत, या अग्निशमन दलाच्या आवाहनाकडेही त्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात मकर संक्रात, नाताळ, नवे वर्ष, वाढदिवस, लग्नांचा वाढदिवस आणि कंपनीचा व्यावसायिक कार्यक्रम आदींचे औचित्य साधून आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे सोडले जात आहेत. त्यामुळे आकाशात प्रदूषण होण्यासह हवाई दलाच्या विमानांना धोका उत्पन्न होण्याकडे लोक दुर्लक्ष करत असल्याने तज्ज्ञमंडळी खंत व्यक्त करत आहेत. याशिवाय आकाशात अशा प्रकारचे दिवे सोडण्याची प्रथा ब्राझील आणि पोर्तुगालमधून भारतात आली आहे. तिथे जून महिन्याच्या सुट्टीत मोकळ्या मदानातून हे दिवे आकाशात सोडले जातात. मात्र तेथील शहरांची भौगोलिक रचना आणि मुंबईची रचना यात प्रचंड फरक आहे. आपल्याकडे इमारतींची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे शहराला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लोकांनी लक्षात घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
आठ महिन्यांपूर्वी आकाशात सोडण्यात येणाऱ्या एका दिव्यामुळे मालाडच्या एका इमारतीच्या संपूर्ण मजल्यावर आग पसरली होती. सुदैवाने या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने त्यात लोक राहात नव्हते. मात्र ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाच तासांचा कालावधी लागला होता. त्यामुळे लोकांनी अशा दिव्यांची खरेदीसुद्धा करू नये, असे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी केले आहे. याशिवाय यावर बंदी आणण्यासाठी महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबईच्या अनेक प्रमुख बाजारात हे दिवे उपलब्ध आहेत. अगदी ३५ रुपयांपासून ते अडीच हजार रुपये किमतीला मिळत आहेत. चिनी बनावटींच्या या दिव्यांचे वजन १०० ग्रॅम ते ४०० ग्रॅमपर्यंत आहे. सप्तरंगात उपलब्ध असलेल्या या दिव्यांत पाच, दहा आणि वीस असा एकत्रित संच मिळत आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कारवाईच्या भीतिपोटी छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेक संकेतस्थळांवर ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी सवलती दिल्या जात आहेत. याला ग्राहकदेखील उत्तम प्रतिसाद देत असल्याचे दिसते. अग्निशमन दल व मुंबई महापालिका यांच्यामुळे मुंबईतील बाजारात मिळणाऱ्या दिव्यांवर बंदी घालती जाऊ शकते. मात्र कोणत्याही र्निबधांशिवाय सुरू असलेल्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्याची जबाबदारी कोण उचलणार, असा सवाल सामाजिक कार्यकत्रे हिरेन जोशी यांनी उपस्थित केला आहे.

काय होऊ शकते?
’ रात्रीच्या वेळी हवाई दलाची विमाने सराव करण्यासाठी आकाशातून काही अंतर खाली येतात. यावेळी प्रखर प्रकाशझोतामुळे त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात.
’ या दिव्यांचा विद्युत तारेशी संपर्क येऊन नुकसान होऊ शकते.
’ उत्तुंग इमारतीच्या वातानुकूलित यंत्रांशी संपर्क झाल्यास आग लागू शकते.
’ बांधकाम इमारतींवर लाकूड आणि प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. अशा ठिकाणी दुर्घटना होऊ शकते.
’ प्रामुख्याने घुबड आणि वटवाघळांना त्रास होऊ शकतो.