मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार व कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला भारतात परतायचे होते, हा युक्तिवाद मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी फेटाळून लावला. भारतात परतण्यासाठी दाऊद कधीही गंभीर नव्हता. जर एखाद्याला खरंच परतायचे असेल, तर तो त्यासाठी अटी कशा काय घालू शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मुंबईमध्ये एका कार्यक्रमात सिंग यांनी दाऊदला भारतात परतायचे होते, हा दावा खोटा असल्याचे सांगितले. आपल्याला भारतात परतायचे होते, असे खोटे चित्र दाऊद रंगविण्याचा प्रयत्न करतो आहे, असाही दावा सिंग यांनी केला. ते म्हणाले, जर एखाद्या गुन्हेगाराला खरंच भारतात परतायचे असेल, तर तो त्यासाठी अटी घालणार नाही. त्याला केवळ आपल्याला भारतात परतायचे होते, असे खोटे चित्र रंगवायचे होते. मूळात एक गॅंगस्टर असलेला दाऊद नंतर दहशतवादी बनला. आपले शिक्षण पूर्ण न करताही त्याने आज जवळपास साडेसहा अब्ज डॉलरची संपत्ती अवैध मार्गाने जमवली आहे. त्यामुळे तो आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कसा करतो, हे सुद्धा दिसून येते.
मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या दाऊदला आयुष्याचा उर्वरित काळ मुंबईतील आपल्या कुटुंबकबिल्यासोबत व्यतीत करायचा आहे. या पार्श्वभूमीवर त्याने २०१३ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारकडे भारतात येऊन १९९३ बॉम्बस्फोट मालिकेसंदर्भातील खटल्याला सामोरे जायची तयारी दर्शवली होती. दाऊदच्या या प्रस्तावाची चर्चा काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांशी झाली. मात्र, अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला. तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. परंतु दाऊदच्या अटी-शर्थीवर खटला चालवणे जोखमीचे ठरेल, असे लक्षात आल्याने हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला होता.