छोटा राजनाचा विशेष न्यायालयासमोर दावा  

पोलीस आणि राजकारणी यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संधान बांधून आपल्याला विविध गुन्ह्यंमध्ये गोवल्याचा दावा पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी छोटा राजन याने सोमवारी विशेष ‘मोक्का’ न्यायालयासमोर केला. एवढेच नव्हे, तर डे यांच्या हत्येशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचा दावाही राजन याने या वेळी केला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी सादर केलेल्या साक्षीपुराव्यांबाबत विशेष न्यायालयाने आरोपी म्हणून राजन याचा जबाब नोंदवून घेतला. त्या वेळी न्यायालयात त्याने हा दावा केला.

डे यांच्या हत्येप्रकरणी राजन हा प्रमुख आरोपी आहे. त्यानेच डे यांच्या हत्येचा कट रचून त्यानुसार आपल्या हस्तकांकरवी त्यांची हत्या घडवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेले साक्षीपुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे साक्षीदारांनी दिलेली साक्ष तसेच डे यांची हत्या राजन याने आपल्या हस्तकांकरवी केल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी सादर केलेले पुरावे याबाबत फौजदारी दंडसंहितेच्या कलम ३१३ नुसार राजन याचा आरोपी म्हणून जबाब नोंदवण्यात आला. या माध्यमातून आरोपीला त्याच्याविरूद्ध सादर करण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांविषयी थेट त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते.

सोमवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश समीर अडकर यांनी राजनला एकूण ४६० प्रश्न केले. राजन सध्या तिहार कारागृहात असून ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून त्याचा हा जबाब नोंदवण्यात आला.

न्यायालयाने केलेल्या बहुतांशी प्रश्नांना राजन याने ‘संबंधित पुरावा खोटा आहे’ वा ‘मला माहीत नाही’, असेच उत्तर दिले. सगळे प्रश्न विचारून झाल्यानंतर ‘तुला आणखी काही सांगायचे आहे का’, अशी विचारणा न्यायालयाने त्याला केली. त्या वेळी १९८३ ते १९९३ या कालावधीत आपण दाऊदसोबत होतो आणि या कालावधीत आपल्यावर एकही गुन्हा दाखल झाला नव्हता, असा दावा राजनने या वेळी केला. परंतु १९९३ सालच्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर आपण दाऊदसोबत फारकत घेतली. एवढेच नव्हे, तर त्याच्याबाबत आपण पोलिसांना माहितीही पुरवली. याबाबत त्याला कळले आणि त्यानंतर कुठलाही गुन्हा घडला तरी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला जायचा. बनावट चकमकीप्रकरणीही माझे नाव गोवण्यात आले. दाऊदच्या इशाऱ्यावरूनच आपल्याला या सगळ्या प्रकरणांमध्ये गोवण्यात आल्याचा दावाही राजन याने केला.

आयफोनबाबत अनभिज्ञ

आपल्याकडून आयफोन आणि आयपॅड हस्तगत करण्यात आल्याचा दावा पोलीस करत असले तरी ते आपले नाहीत. शिवाय त्यात नेमकी काय माहिती होती याचीही आपल्याला काडीमात्र कल्पना नसल्याचा दावा राजनने केला.

युक्तीवाद ऐकवण्याची मागणी

याप्रकरणी होणारा अंतिम युक्तिवाद आपल्याला ऐकायचा आहे. त्यामुळे ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’मध्ये येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्याचे आदेश देण्याची विनंतीही त्याने न्यायालयाकडे केली.

’ न्यायालयाने राजनला एकूण ४६० प्रश्न विचारले

’ राजन याने ‘संबंधित पुरावा खोटा आहे’ वा ‘मला माहीत नाही’, असेच उत्तर दिले.

’ जे. डे यांच्या हत्येशी काडीचाही संबंध नसल्याचा दावा