बेबी पाटणकर आणि धर्मा काळोखे अमली पदार्थ प्रकरणात अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त नामदेव चव्हाण यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मरिन ड्राइव्हचा बडतर्फ पोलीस हवालदार धर्मा काळोखे आणि तस्कर बेबी पाटणकर या दोघांच्या अटकेनंतर पाच पोलिसांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यात आझाद मैदान अमली पदार्थ विरोधी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले यांचा समावेश होता. धर्मा काळोखेवर सातारा पोलिसांनी छापा घालण्यापूर्वी उपायुक्त नामदेव चव्हाण यांना सांगितले होते, तसेच बेबी पाटणकरचे मोबाइल क्रमांकही ती फरार असताना दिले होते, असा दावा गोखले यांनी चौकशीत केला होता. त्यामुळे चव्हाण यांच्याकडेही चौकशी केली जाईल, असे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तर चव्हाण यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.