मैला रोखण्यासाठी पालिकेने लावलेली लोखंडी जाळी दहा दिवसांत गायब

दहिसर नदीच्या काठावरील तबेल्यांच्या मालकांकडून गुरांचे शेण तसेच मृतदेह थेट नदीत फेकले जात असल्याच्या तक्रारी वाढत असून गुरांचा मैला रोखण्यासाठी पालिकेने दहा दिवसांपूर्वी बसवलेली लोखंडी जाळीदेखील गायब करण्यात आल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे. नदीच्या पाण्यासोबत गुरांचा मैला वाहून येत असल्याने परिसरात दुर्गंधी कायम आहे. या प्रकारामुळे नदी स्वच्छता अभियानाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ्रता मोहिमेवर पाणी पसरले जात असल्याची खंत मोहिमेतील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावणारी दहिसर नदी बारा किलोमीटरचा प्रवास करीत दहिसरमध्ये खाडीला मिळते. उद्यानाबाहेर पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असणाऱ्या श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स खालून सांडपाण्याची वाहिनी जाते. याच ठिकाणी नदीच्या दुसऱ्या बाजूस गुरांचे तबेले आहेत. नदीकिनारी असणाऱ्या तबेल्यांमधील शेण नदीत वाहून येण्यास अटकाव व्हावा यासाठी २१ जुलै रोजी पालिकेकडून याठिकाणी लोखंडी जाळी लावण्यात आली होती. मात्र दहा दिवसांनी लोखंडी जाळी चोरीला गेली असून मोठय़ा प्रमाणात शेण नदीत वाहून येत असल्याची माहिती श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समधील रहिवासी दीपेन देसाई यांनी दिली. याशिवाय गुरांचे मृतदेह नदीत वाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नदी स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या रिव्हर मार्च मोहिमेतील कार्यकर्त्यांकडून वारंवार या ठिकाणी जनजागृती करूनही तबेलामालक मोठय़ा प्रमाणात गुरांचे शेण नदीत टाकत आहेत. पालिकेकडून लावण्यात आलेली जाळी काढून त्या ठिकाणी शेण टाकण्यात आल्याने तबेलामालकांची मुजोरी दिवसागणिक वाढत असल्याचे ‘रिव्हर मार्च’चे तेजस शहा यांनी सांगितले. या वेळेस आमच्याकडून नाल्याच्या आतील बाजूस जाळी लावली जाईल आणि नदीत शेण व गुरांचे मृतदेह टाकणाऱ्या तबेलामालकांविरोधात पोलीस तक्रार केली असल्याचे ‘आर मध्य’ विभागाचे साहाय्यक आयुक्त अतुल राव यांनी सांगितले.