कठडय़ाखालील खडकांवर उतरल्याने अपघात

सेल्फी घेण्याच्या नादात विशीतील तरुणाने शनिवारी दुपारी मरिन ड्राइव्ह किनाऱ्यावर जीव गमावला. किनाऱ्याच्या कठडय़ाखालील दगडांमध्ये उतरून मित्रासोबत सेल्फी घेताना हा तरूण घसरला आणि ओहोटीच्या लाटांमध्ये बुडाला. अपघातानंतर मित्राने तेथून पलायन केले. तर तरुणाला वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेणारा अन्य तरूण जखमी झाला. अद्याप मृत तरुणाची ओळख पटलेली नाही. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी मरिन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटीपर्यंत तब्बल एक लाखांहून अधिक पर्यटक जमले होते. दर पावसाळ्यतल्या सुटीच्या दिवशी येथे असेच चित्र असते. लाटांमुळे होणारी झीज रोखण्यासाठी कठडय़ाखाली मोठय़ा प्रमाणात कॉंक्रिटचे दगड टाकण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी मरिन ड्राइव्हवर आलेले दोन तरूण त्या दगडांवर उतरले. तेथे उतरून ते सेल्फी घेत होते. इतक्यात एकाचा पाय सरकला आणि तो समुद्रात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी पर्यटकांमधील एक तरूण खाली उतरला. मात्र तोही जखमी झाला. या तरूणाला पोलीस, पर्यटकांनी समुद्रातून बाहेर काढले. मात्र बुडालेल्या तरूणाला २० मिनिटांनंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाचा मित्र घटनेनंतर पळून गेला. अद्याप मृत तरूणाची ओळख पटलेली नाही, चौकशी सुरू आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी प्रीती पिसे(१७) या महाविद्यालयीन तरुणीचा अशाचप्रकारे सेल्फीच्या नादात मृत्यू ओढवला होता. मरिन ड्राइव्ह आणि दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्याकडून गर्दीच्या दिवशी विशेष गस्त आणि बंदोबस्त ठेवला जातो. शनिवारीही समुद्रात उतरू नका, लाटांपासून सावधान, अशा आशयाच्या उद्घोषणाही दिल्या जात होत्या. तसेच गस्तही सुरू होती.