‘झोपू’ योजनेच्या इमारतींमधील रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा
मालाड, कुरार येथील ‘झोपू’ योजनेच्या इमारतींमधील रहिवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून हे पाणी पिऊन दीड वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी ‘ओमकार डेव्हलपर्स’चे व्यवस्थापक रॉबिनसिंग तसेच विकासक व संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वेदांत जेठवा असे मरण पावलेल्या मुलाचे नाव असून या प्रकरणी ब्रिजेश राजभर यांनी कुरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
९ नोव्हेंबर या दिवशी राजभर यांचा दीड वर्षे वयाचा मुलगा अनुज याला उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्याला उपचारासाठी व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा दूषित पाण्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि उपचार करुन घरी सोडले. बुधवारी त्याला पुन्हा तो त्रास सुरू झाल्याने कुरार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याच इमारतीमधील रहिवासी हरेश जेठवा यांच्या दीड वर्षे वयाच्या वेदांत या मुलाला दूषित पाणी पिऊन त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कुरार पोलीसांच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. ‘ओमकार डेव्हलपर्स’ यांनी ‘झोपू’ योजनेत विकसित केलेल्या अन्य इमारतीमधील अनेक रहिवाशांनाही दुषित पाणी प्यायल्याने त्रास सुरु झाला आहे. या सगळ्यांना जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिर्यादी राजभर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहितीही या पत्रकात देण्यात आली आहे.