‘टाइप टू’ प्रकारच्या विषाणूंच्या फैलावाची भीती

गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या तोंडावाटे देण्याच्या पोलिओ लसीमध्ये टाइप टू प्रकारचे विषाणू आढळले आहेत. सदोष असलेल्या या लसीतून पोलिओचा फैलाव होण्याचा संभव असल्याने तिच्या वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

या कंपनीची लस देशभर वापरण्यात येते. राज्यामध्येही तिचा वापर केला गेला असण्याची शक्यता आहे. बायोमेड या गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीमध्ये टाइप टू या प्रकाराचे विषाणू आढळले आहेत. या लसीद्वारे पोलिओच्या विषाणूचा जगभरात फैलाव झाल्याची शक्यता आहे. भारतातही या कंपनीच्या पोलिओ लसचा वापर केला जातो. भारत पोलिओमुक्त झाल्यानंतर अशा रीतीने सदोष लसीच्या माध्यमातून पुन्हा पोलिओ उद्भवू नये, यासाठी केंद्र सरकारने तिच्या वापरावर बंदी आणली आहे. बायोमेड ही कंपनी केवळ सरकारी रुग्णालयांना या लसचा पुरवठा करत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये याचा धोका नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमधील एका मुलाच्या शौचात पोलिओचे विषाणू आढळल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीतून ही लस सदोष असल्याचे उघड झाले. या लसीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातूनही लस सदोष असल्याचे निष्पन्न झाले. केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने बायोमेड कंपनीविरोधात गुन्हा नोंदविला असून कंपनीच्या कार्यकारी संचालकांना गुरुवारी अटकही करण्यात आली आहे.

राज्यात ११ सप्टेंबरपासून वापर बंद

बायोमेड कंपनीच्या लसीचा वापर बंद करण्याची सूचना १० सप्टेंबरला केंद्र सरकारकडून मिळाली होती. त्यानुसार ११ सप्टेंबरपासून राज्यभरात या कंपनीच्या लसीचा वापर थांबविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केले आहे.