केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते सोमवारी आयएनएस चेन्नई ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. आयएनएस चेन्नई ही कोलकाता श्रेणीतील क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणाली असलेली तिसरी स्वदेशी बनावटीची युद्धनौका आहे. या कार्यक्रमाला नौदलप्रमुख सुनील लांबा हेदेखील उपस्थित होते. भारतीय नौदलातील सर्वात मोठ्या विनाशिकांपैकी एक असलेल्या आयएनएस चेन्नईची लांबी १६४ मीटर असून वजन ७,५०० टन इतके आहे. याशिवाय, ही विनाशिका भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणाऱ्या ब्राह्मोस आणि बराक-८ या भूपृष्ठावरून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. याशिवाय पाणतीरांचा मारा झाल्यास त्यालाही चकवा देणारी ‘मारीच’ नावाची यंत्रणा प्रथमच बसविण्यात आली आहे. काही चाचण्यानंतर आयएनएस चेन्नई नौदलाच्या पश्चिमेकडील ताफ्यात दाखल होईल. याशिवाय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ)भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना शत्रूपासून रोखणारे ‘कवच’ हे आयएनएस चेन्नईचे वैशिष्ट्य आहे. शत्रूच्या युद्धनौका अथवा हवाई टेहळणीदरम्यान भारतीय युद्धनौका आढळल्यानंतर त्यांनी क्षेपणास्त्र डागल्यास युद्धनौकेचा हमखास बचाव करणारे क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र वापरण्याखेरीज दुसरा पर्याय आजवर नौदलाकडे उपलब्ध नव्हता. म्हणूनच गेली काही वर्षे ‘डीआरडीओ’तर्फे शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणाऱ्या ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती सुरू होती. शत्रूचे क्षेपणास्त्र येते आहे, हे लक्षात येताच ‘कवचा’मधून एक विशिष्ट आभासी असे काही डागले जाते की, त्यामुळे युद्धनौकेपासून दूर अंतरावर एक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभासी ढग निर्माण होतो. क्षेपणास्त्राला अधिक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभास आहे, हे लक्षात येत नाही आणि युद्धनौकेऐवजी त्या आभासी ठिकाणी जाऊन ते फुटते. परिणामी युद्धनौकेचा यशस्वी बचाव होतो, असे हे तंत्र आहे.

भारतीय नौदलाच्या ‘प्रकल्प१५अल्फा’ मध्ये कोलकाता वर्गातील गायडेड मिसाईल विनाशिकांची निर्मिती करण्यात आली. त्यातील आयएनएस तिसरी आणि अखेरची विनाशिका आहे. या तीन विनाशिकांच्या प्रकल्पावर नौदलाने सुमारे साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.